भरतनाट्यम, शास्त्रीय गायनाची मेजवानी; स्वरसागर संगीत महोत्सवास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 February 2021

पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी यांचे शास्त्रीय गायन झाले. पंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना स्वरवंदना अर्पण करण्यात आली.

पिंपरी - विद्यार्थिनींचे भरतनाट्यम, पं. श्रीनिवास जोशी व पं. संजीव अभ्यंकर यांचे शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, पिंपरीतील आचार्य अत्रे नाट्यगृहात आयोजित स्वरसागर महोत्सवाचे. त्यात निगडीतील नृत्यकला मंदिराच्या विद्यार्थिनींनी ‘नमो नटराजा’ हे भरतनाट्यम सादर केले. तर, ‘आंगिकन भुवनम यस्य’ या शिवस्तुतीने प्रारंभ झाला. 

पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी यांचे शास्त्रीय गायन झाले. पंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना स्वरवंदना अर्पण करण्यात आली. श्रीनिवास जोशी यांनी राग ‘मारुबिहाग’ व ‘रसिया आयो ना’ हा बडा ख्याल सादर केला. स्वरसाथ विराजने केली. दोघांनी ‘माझा भाव तुझे चरण’, व ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हे अभंग सादर केले. गंगाधर शिंदे (संवादिनी), पांडुरंग पवार (तबला) आणि मुरलीधर पंडित व प्रेरणा दळवी (तानपुरा) यांनी साथसंगत केली. 

'वाघा बॉर्डरपेक्षा वाईट परिस्थिती आंदोलनस्थळी'; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर ओढले ताशेरे

पं. संजीव अभ्यंकर यांनी राग ‘मालकंस’ने सुरवात केली. ‘बिरहा सताये मोहे’ ही विलंबित तालातील व ‘गरज बदरवा डोले रे माई’ या द्रुतलयीतील बंदिश सादर केली. त्यानंतर ‘कलावती’ रागातील तराणा सादर केला. गमकयुक्त गाणे म्हणजे काय याचा सुंदर वस्तुपाठच त्यांनी रसिकांना घालून दिला. संत तुकाराम महाराजांच्या ‘आता कोठे धावे मन’ हा अभंगही त्यांनी सादर केला. गायनसाथीच्या शिष्यांसह त्यांनी केलेला विठ्ठल नामाचा गजर रसिकांना भक्तिरसात चिंब भिजवून गेला. त्यांना अभिनय रवंदे (संवादिनी), रोहित मुजुमदार (तबला), विलीना पात्रा, मुक्ता जोशी व साईप्रसाद पांचाळ (गायन) आणि स्मिता देशमुख (तानपुरा) यांनी संगत केली. 

हद्द झाली! चोरट्यांनी पुण्याच्या एसीपींचा किंमती श्वान पळवला; अन्...

दरम्यान, उद्‌घाटनानंतर नृत्यकला मंदिरच्या विद्यार्थिनींनी पुष्पांजली, नटेश कौतुकम, अभिनयाचे दर्शन घडवणारी ‘पदम’ ही रचना सादर केली. शुद्ध नर्तन सादर करणाऱ्या ‘तिल्लाना’नंतर ‘मन भज शंकर नारायणा’ या शिव व विष्णू यांच्या एकत्रित ‘शिवमंगलम’ने अभिजात भरतनाट्यम नृत्याची सांगता केली. गुरु तेजश्री अडीगे यांच्या मार्गदर्शनाखाली रुचाली बोरुले, संस्कृती मगदूम, कुमुदिनी पाटील, सायली काणे आणि अनुजा हिरेकर या नृत्यांगनांनी सादरीकरण केले. 

संगीत म्हणजे आनंद - नारळीकर
‘‘सांगीतिक कार्यक्रम सर्वांना समाधान आणि आनंद देणारा असतो, तसाच स्वरसागत संगीत महोत्सवसुद्धा आहे,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी स्वरसागर महोत्सवाचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. त्यांच्या पत्नी गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर होत्या.

कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र विद्यार्थ्यांनो, UGCची नवी नियमावली जाहीर!

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित २२ व्या स्वरसागर महोत्सवात महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र शास्त्रीय गायक श्रीनिवास जोशी, महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे, नगरसेविका सुजाता पालांडे, पिंपरी-चिंचवड सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल गालिंदे, संयोजक संजय कांबळे आदी उपस्थित होते. यंदाचा ज्येष्ठ गायक पंडित पद्माकर कुलकर्णी युवा कलाकार पुरस्कार युवा तबला वादक शंतनू देशमुख याला पं. संजीव अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

जोशी म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांचा खाक्‍या होता, जे बोलायचे ते गाण्यातूनच. त्यांच्या या उपदेशानुसार मी माझ्या गाण्यातूनच व्यक्त होणार आहे. काही वर्षांपूर्वी मी स्वरसागरमध्ये गायनसेवा केली आहे. लोकांची सांस्कृतिक गरज या महोत्सवातून पुरवली जाते याचा आनंदच आहे.’’ मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुरेखा कुलकर्णी यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chichwad News Swarsagar Music Festival start