esakal | Pimpri : शहरात इ-बाईक खरेदीकडे कल
sakal

बोलून बातमी शोधा

electric bike

Pimpri : शहरात इ-बाईक खरेदीकडे कल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी " भरमसाट पेट्रोल दरवाढीमुळे सध्या इलेक्ट्रीक बाईक खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. आकर्षक डिझाइन आणि विना आवाज, प्रदूषणविरहित गाडी असल्याने तरुणांचीही पसंती या गाड्यांना मिळू लागली आहे. त्यामुळे रस्त्यावर शहरात फिरताना आता इलेक्ट्रीक दुचाकी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

पेट्रोल शंभरीवर गेल्याने नागरिक विविध कामानिमित्त फिरतानाही आता काटकसर करू लागले आहेत. वाहन बाजारातही आता पेट्रोल पंप टाकणारे पर्यायी विचार करू लागले आहेत. पंपामध्ये मोठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक सीएनजी आणि इलेक्ट्रीकडे वळविण्याचा विचार अनेक व्यावसायिक करत आहेत. कारण पेट्रोल महागाईने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. वाहन बाजारातही व्यावसायिक आता इलेक्ट्रीक वाहनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहेत. अनेकांनी इलेक्ट्रीक बाइकवर आता विविध ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल, असे वाहन बाजारात आल्याने नागरिकही त्यादृष्टीने विचार करीत आहेत.

शहरात छोट्या प्रमाणात असणारे इ-बाईक शोरुमची बाजारपेठ विस्तारू लागली आहे. त्यामुळे अनेकजण दिवाळीच्या तोंडावर पेट्रोलचा खर्च वाचवून इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्याचा विचार करू लागले आहेत. कोविड कालावधीत अनेकांच्या खिशात पैसाच उरला नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या इलेक्ट्रीक बाइकच्या किंमती पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या किमती इतक्याच असल्याने अनेकांच्या खिशाला ते परवडत आहे. ५० हजारांपासून ते एक लाखापर्यंतची गुंतवणूक या वाहनांमध्ये आहे. परंतु, बचतही दुपटीने आहे.

सध्या शहरात चार्जिंग स्टेशन करण्याचा विचारही अनेकजण करू लागले आहेत. मोशीतील सोसायटीने देखील ही गरज ओळखून स्टेशन उभारले. सरकारही इलेक्ट्रीक वाहतुकीला पाठिंबा देत असल्याने अनेक सवलती मिळू लागल्या आहेत. ना पासिंग फी, नोंदणी खर्च नसल्याने आरटीओची कोणतीही प्रक्रिया नसल्याने वेळ वाचत आहे. काही सुपरफास्ट चार्जरही बाजारात येण्याची चर्चा आहे. ज्यामुळे दुचाकी अवघ्या आठ ते दहा मिनिटांत चार्ज होणार आहे. सध्या लॅपटॉप किंवा मोबाईल चार्जिंगप्रमाणे घरात तीन ते चार तास सुरक्षितपणे बॅटरी चार्ज करता येते. कुठेही चार्जिंग करता येणार असल्याने सोपे काम होत आहे. सध्या लिथियम बॅटरी चार्ज करण्यासाठी तीन तास तर इतर बॅटरी चार्ज करण्यासाठी दुप्पट वेळ लागत आहे. चार्जिंगनंतर ७० ते ९० किलोमीटरपर्यंत वाहने धावत आहेत. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी व बाहेरगावी जाण्यासही या वाहनांची मदत होत आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

  • २.५ किलोवॉट

  • पोर्टेबल बॅटरी

  • ६० किलोमीटर स्पीड

  • ९० ते १२० किलोमीटर रेंज

  • वाहनांना स्मार्ट लॉक

  • १२० किलोमीटर प्रती चार्ज

  • मेंटेनन्सचा नाही त्रास

  • वीज प्रती युनिट खर्च ७ ते ८ रुपये

  • शहरात सात इलेक्ट्रीक शोरूम

मार्च महिन्यात मी लॉजिकॉन कंपनीचे प्युअर इलेक्ट्रीक दुचाकी वाहन खरेदी केले. पेट्रोल भरण्यासाठी एकदाही पंपावर जावे लागले नाही. बचत झाली. आतापर्यंत सहा महिन्यांत साडेदहा हजार किलोमीटर गाडी चालविली. २५ हजार रुपयांची पेट्रोल बचत झाली. कोणताही देखभाल दुरुस्तीचा खर्च नाही. चार्जिंगचेही टेन्शन नाही. घरात किंवा बाहेर कुठेही चार्जिंग करता येते.

- शंकर केशवाड, चिंचवड

loading image
go to top