पिंपरी-चिंचवडकरांनो, आणखी काही महिने दिवसाआडच पाणी

पीतांबर लोहार
Tuesday, 22 September 2020

  • जादा पाणी उचलून शुद्धीकरणाची क्षमता महापालिकेकडे नाही 

पिंपरी : पवना धरण शंभर टक्के भरलेय. रावेत बंधारा ओसंडून वाहतोय. तरीही दिवसाआड पाणी, अशी शहराची स्थिती आहे. जादा अशुद्ध जलउपसा व शुद्धीकरण क्षमता तूर्त महापालिकेकडे नाही. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून, पुरेशा पाण्यासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. पर्यायाने दिवसाआड पाण्यावरच तहान भागवावी लागेल, अशी वस्तुस्थिती आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाबत समुपदेशन; आतापर्यंत 15 हजारांवर नागरिकांचं शंकासमाधान

सद्यःस्थिती 

- जलसंपदा विभागाकडून मंजूर कोट्याइतके 480 दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा 
- एमआयडीसीकडूनही प्रतिदिन 30 दशलक्ष पाणी विकत घेतले जात आहे 

दिवसाआडचा निर्णय का? 

अनियमित, अपुरा व कमीदाबाने पाणीपुरवठा होतोय; दिघी, चऱ्होलीसारख्या उंच व शेवटच्या भागात कमी पाणी मिळतेय. पहिल्या, दुसऱ्या मजल्यांवरसुद्धा पाणी पोचत नाही. गळती अधिक आहे, अशा तक्रारींमुळे समन्यायी पद्धतीने पाणी वितरणाचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आणि 25 नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. 

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 2023 मध्ये धावणार? 

तक्रारी घटल्या 

दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे तक्रारींचे प्रमाण 80 टक्‍क्‍यांपर्यंत घटल्याचा प्रशासनाचा दावा आहे. शिवाय, यंदाचा उन्हाळा व लॉकडाउनच्या चार महिन्यांत अनेक जण घरात होते. अनेकांचे वर्क फ्रॉम होम अद्यापही सुरूच आहे. परिणामी, पाण्याचा वापर वाढलाय, पण, तक्रारी वाढलेल्या नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. 

परिस्थिती 'जैसे-थे' 

दिवसाआडचा पाणीपुरवठ्याचा निर्णय झाला तेव्हा आणि आताही रावेत बंधारा येथील अशुद्ध जलउपसा व निगडीतील जलशुद्धीकरण क्षमता प्रतिदिन 510 दशलक्ष लिटरच आहे. त्यापेक्षा अधिक पाणी उचलण्याची यंत्रणा नसल्याने जादा पाणी मिळणे अशक्‍य आहे. 

चारशे दशलक्ष लिटरचे लक्ष्य 

- निगडी प्रकल्प : निगडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता आणखी शंभर दशलक्ष लिटरने वाढविण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, सहा महिन्यांपासून तो कागदावरच आहे. 
- चिखली प्रकल्प : आंद्रा व भामा-आसखेड धरणातून मंजूर कोट्यासाठी 300 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात शंभर दशलक्ष लिटरच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. 

अधिकाऱ्यांची आज बैठक 

शहराच्या अनेक भागात गढूळ व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तातडीने उपाययोजना करून स्वच्छ व योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा, अशी तक्रार उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली आहे. या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यानुसार मंगळवारी (ता. 22) दुपारी चार वाजता बैठक आयोजित केली आहे. 
 

पवना धरण शंभर टक्के भरूनही दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या, पोटदुखीचे आजार होत आहेत. काही भागांत कमी दाबाने व अवेळी पाणी मिळत आहे. कोरोना काळात पुरेसे पाणी न मिळणे गंभीर आहे. 
- तुषार हिंगे, उपमहापौर 

तीन ते सहा सप्टेंबर या कालावधीत पाणीपुरवठा व विद्युत यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती आणि दोन वेळा खंडित झालेला वीजपुरवठा, यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. या काळात तक्रारी वाढल्या होत्या. आता पाणीपुरवठा पूर्ववत होत आहे. 
- रामदास तांबे, सहशहर अभियंता, महापालिका 
 
पूर्वी सकाळी व संध्याकाळी रोज पाणी यायचे. आता दिवसाआड दुपारी दोन तास पाणी येते. पण, प्रेशर कमी असल्याने पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर चढत नाही. त्यासाठी प्रेशर वाढवायला हवे. मग, दिवसाआड पाणी आले तरी काही हरकत नाही. 
- राजेंद्र गोराणे, नागरिक, रहाटणी 

पवना धरणातून मंजूर कोटा 

  • वार्षिक : 6.51 टीएमसी (अब्ज घनफूट) 
  • प्रतिदिन : 470 एमएलडी (दशलक्ष लिटर) 

अतिरिक्त पाण्याची प्रतीक्षा 

  • आंद्रा धरण : 100 एमएलडी 
  • भामा-आसखेड : 168 एमएलडी 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad city water supply news