
Pimpri : पालिकेची ४३ कोटी ९८ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी
पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी औषधे आणि साहित्यांची तातडीने आवश्यकता आहे. त्यांच्या खरेदीकामी येणाऱ्या ४५ लाख एक हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जंबो कोविड रुग्णालयातील १४० बेड आणि इतर बेड सुरु ठेवणेबाबत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी एक कोटी ४२ लाख इतक्या खर्चाचही मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर किमान वेतन कायद्यानुसार ३६ कामगार व दोन सुपरवायझर यांचे तीन महिने कालावधीकरीता २९ लाख ४७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी दिली.
ऑनलाईन बैठकीच्या अध्यक्षस्थानी लांडगे होते. या बैठकीत विविध विकास कामांसाठी ४३ कोटी ९८ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक २३ मधील हेडगेवार पुल ते कुणाल रेसीडेन्सी पर्यंत जाणारा १२ मीटर रुंद रस्ता विकसीत करण्याकामी येणा-या ४४ लाख २० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक २७ रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणे आणि अनुषंगीक कामे करण्याकामी येणा-या एक कोटी ९२ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
टाटा मोटर्स रस्ता भोसरी ते थरमॅक्स चौक रस्ता सुशोभिकरण व मध्यदुभाजक उद्यान विषयक कामाची देखभाल करण्याकामी येणा-या एक कोटी २२ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. ‘क’ आणि ‘ई’ क्षेत्रिय कार्यालयातील रस्ते मध्य दुभाजक सुशोभिकरण देखभाल करण्यासाठी येणा-या ७१ लाख ७७हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. वैद्यकीय विभागाच्या वापराकरीता ब्लड मोबाईल कलेक्शन व्हॅनचे मनपा स्पेसीफिकेशनप्रमाणे चॅसी खरेदी करण्यासाठी येणा-या ३७ लाख १० हजार अधिक सेवाकर इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.