सणामुळे पिंपरी-चिंचवडमधील बाजारपेठा पुन्हा फुलल्या 

सणामुळे पिंपरी-चिंचवडमधील बाजारपेठा पुन्हा फुलल्या 

पिंपरी - कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाउनमध्ये पाच महिने बंद असलेली बाजारपेठ "अनलॉक'मध्ये सुरू झाली. परंतु आता नवरात्रोत्सव - दसरा सणासाठी बाजार पेठा सज्ज झाल्या आहेत. दसऱ्याला अनेक जण नवीन कपड्यांसह विविध प्रकारच्या वस्तू, सोने-चांदी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्या पार्श्‍वभूमीवर कोरोनामुळे हिरमुसलेला बाजार पुन्हा एकदा सजला आहे. खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडल्याने मरगळलेल्या बाजारपेठेवर चैतन्याचा साज चढलेला पहायला मिळत आहे. नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलल्याने व्यापारीवर्गातही समाधानाचे भाव आहेत.

लॉकडाउनमुळे मार्च, एप्रिल आणि मे, जून या महिन्यात सगळ्याच बाजारपेठा बंदच होत्या. काही महिन्यांपासून सम- विषमनुसार अंशतः: बाजार भरू लागला होता. एकूणच कोरोनामुळे बाजारपेठेत मंदीचे सावट होते. परतीच्या पावसामुळे बाजारपेठांची स्थिती थबकल्यासारखी झाली होती. पण नवरात्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आलेली ही मरगळ झटकून पिंपरी चिंचवडकर खरेदीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेले दिसत आहेत. त्यातही नवीन घर, कपडे, सोने-चांदी, दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू खरेदीकडे अनेकांचा कल आहे. एलईडी टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रिज, एसी, मिक्‍सर, स्वयंपाकाची आधुनिक नॉन स्टीकची भांडी, मोबाईल खरेदीवर अनेकांनी लक्ष केंद्रित केले आहे. काही कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर एक वस्तू खरेदी केल्यावर त्यावर दुसरी एखादी वस्तू मोफत दिली जात असल्याने ग्राहकांची पावले बाजारपेठेकडे वळली आहेत. नवरात्रातील दांडिया कार्यक्रम होणार नसल्यातरी त्याची कपड्याची बाजार सजली आहे. लोक कुटुंबासह खरेदीला येत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याने बाजारात उलाढाल वाढल्याची माहिती व्यापारी मंयक जेठवानी यांनी सांगितले. 

दिवाळीपर्यंत बाजारात उलाढाल असेल कायम 
मध्यंतरी बाजारात मंदीची स्थिती होती. पण नवरात्र दसऱ्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी झालेली गर्दी आता दिवाळीपर्यंत कायम असेल, अशी आशा व्यापारी विकी भाटिया यांनी व्यक्त केली. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंवर ऑफर 
इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंमध्ये एलईडी टीव्ही खरेदीस पसंती दिली जात आहे. त्याचबरोबर वॉशिंग मशिन, फ्रिजचीही खरेदी होत आहे. या सर्व वस्तूंवर हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तसेच पेन ड्राईव्ह, होम थिएटर, फ्राय पॅन मोफत दिला जात असल्याची माहिती शहरातील विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गर्दी अन्‌ वाहतूक कोंडी 
शहरात या परिसरामधील बाजारपेठाही सायंकाळी गर्दीने फुलून जात आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत जाण्याऐवजी नागरिकांनी घराजवळील बाजारपेठेतच खरेदीला पसंती दिली. परिणामी, सांगवी, भोसरी, निगडी, आकुर्डी अशा उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वाहनांसह नागरिक बाजारपेठांमध्ये दाखल होत असल्याने पिंपरी कॅम्प - शगून चौकातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com