esakal | पिंपरी : 'स्थायी'वर भाजपकडून कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri Chinchwad Municipal Corporation

पिंपरी : 'स्थायी'वर भाजपकडून कोण?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिका (pimpri chinchwad corporation) स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले नाही, म्हणून पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत सत्ताधारी भाजपचे नगरसेवक रवी लांडगे (ravi landge) यांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा महापौर उषा ढोरे यांच्याकडे सहा महिन्यांपूर्वीच दिला आहे. त्यांनी तो स्वीकारलेला नाही. मात्र, मार्चपासून आतापर्यंत कोणत्याही साप्ताहिक बैठकीला लांडगे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे महापालिका अधिनियमानुसार त्यांची नियुक्ती रद्द झाली असून, त्या रिक्त जागेवर सोमवारी (ता. २०) होणाऱ्या सर्वसाधरण सभेत नवीन सदस्याची नियुक्ती केली जाणार आहे. त्यात भाजप कोणाला संधी देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महापालिकेतील पक्षीय बलाबलनुसार स्थायी समितीवर सदस्यांची नियुक्ती केली जाते. १६ सदस्यांच्या समितीत दहा सदस्य भाजपचे, चार राष्ट्रवादी कॉंग्रेस व प्रत्येकी एक शिवसेना व अपक्ष असे संख्याबळ आहे. त्यातील एकाची अध्यक्षपदी वर्णी लागते. त्यामुळे गेल्या फेब्रुवारीत दोन वर्षांची मुदत संपलेल्या सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची स्थायीवर नियुक्ती करण्यात आली. त्यात भाजपचे भोसरीतील नगरसेवक रवी लांडगे यांचाही समावेश होता. स्थायीचे अध्यक्षपद आपल्याला मिळावे, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, पक्षनेतृत्वाने त्यांच्याऐवजी भोसरीतीलच नितीन लांडगे यांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या रवी लांडगे यांनी तडकाफडकी महापौर उषा ढोरे यांच्याकडे राजीनामा सदस्यपदाचा दिला होता. तो त्यांनी मंजूर केला नाही. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत कोणत्याही सभेला रवी लांडगे उपस्थितीत राहिले नाहीत. परिणामी, महापालिका अधिनियमानुसार स्थायी समिती बैठकांना सलग अनुपस्थित राहिल्याने त्यांचे सदस्यपद रद्द झाले आहे. त्या पदावर आता भाजपकडून नवीन सदस्याची नियुक्ती केली जाणार आहे.

हेही वाचा: राज्यात ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना अ‌ॅलर्ट जारी

‘स्थायी’चे शिलेदार

स्थायी समितीत सध्या भाजपचे नितीन लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे; राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर, शिवसेनेच्या मीनल यादव आणि अपक्ष नीता पाडाळे (भाजप संलग्न) यांचा समावेश आहे. रिक्त जागेवर भाजप कोणाला संधी देणार, हे सोमवारच्या (ता. २०) सभेत स्पष्ट होणार आहे. शिवाय, तो सदस्य लांडगे यांचा समावेश असलेल्या भोसरी विधानसभा क्षेत्रातील असेल की, पिंपरी अथवा चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील याचीही उत्सुकता लागून आहे.

loading image
go to top