पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआडच पाणी; महापालिका आयुक्त काय म्हणाले? वाचा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

अशुद्ध जलउपसा व जलशुद्धीकरण क्षमतेत वाढ होत नाही, तोपर्यंत शहरात दिवसाआडच पाणी पुरवठा सुरू राहील, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

पिंपरी : अशुद्ध जलउपसा व जलशुद्धीकरण क्षमतेत वाढ होत नाही, तोपर्यंत शहरात दिवसाआडच पाणी पुरवठा सुरू राहील, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर पोस्ट कोविड सेंटर सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील पाणीपुरवठा, मुळा, पवना व इंद्रायणी नदी सुधार, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर आणि शहरातील विविध विकास कामांबाबत मंगळवारी सकाळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांची आयुक्तांसमवेत बैठक झाली. त्यासंदर्भात माहिती देताना आयुक्त म्हणाले, "शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, स्त्रोत तेवढेच आहेत. भामा-आसखेड व आंद्रा धरणातून मंजूर कोटा मिळत नाही. पुणे महापालिका क्षेत्रातील वाघोली पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा करावा लागणार आहे. 24 बाय 7 पाणी योजनेअंतर्गतचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल. अनधिकृत नळजोड तोडण्यात येणार आहेत. निगडी-प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता शंभर एमएलडीने वाढविणार आहे. रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राची पंपिंग क्षमता वाढविणार आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना संसर्गाचे प्रमाण आठ ते दहा टक्‍क्‍यांवर आले आहे. मृत्यू कमी होत असले, तरी ऍव्हरेज मृत्यूदर 1.7 टक्केच राहिला आहे. वायसीएममध्ये पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्‍टर, नर्स व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच, खासगी कोविड केअर सेंटर बंद केले जाणार आहेत. केवळ तीनच कोविड सेंटर सुरू ठेवण्यात येणार आहेत. वायसीएम नॉन कोविड करण्याबाबत एक नोव्हेंबरला निर्णय घेतला जाईल. जम्बो कोविड सेंटरच्या ठेकेदाराला सरकारच्या नियमानुसार रक्कम द्यावी लागणार आहे. घरोघरी सर्व्हेतून शहराचा डाटा मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, गंभीर आजाराचे रूग्ण यांची माहिती मिळाली आहे, असेही हर्डीकर म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal commissioner said about water