esakal | पिंपरी : महापालिका उभारणार १३ मजली इमारत
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri-Chinchwad

पिंपरी : महापालिका उभारणार १३ मजली इमारत

sakal_logo
By
अक्षय साबळे

पिंपरी : चिंचवड स्टेशन (chinchwad station) परिसरातील सात एकर जागेवर महापालिकेची (corporation) प्रशासकीय इमारत उभारण्याचे प्रस्तावित आहे. १३ मजली इमारतीसाठी ५५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या बांधकामासाठी सल्लागार म्हणून सुनील पाटील अ‍ॅण्ड असोसिएट्सची नियुक्ती केली आहे. (Pimpri chinchwad Municipal Corporation build 13 storey building)

पुणे-मुंबई महामार्गावरील (pune mumbai highway) सध्याची महापालिका भवनाची इमारत कामकाजासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रशस्त इमारत बांधण्याचे नियोजन प्रशासनाने केले. त्यानुसार महिंद्रा कंपनीच्या गांधीनगर, पिंपरीतील जागेत इमारत बांधण्याचे निश्चित केले होते. त्यासाठीच्या एकूण येणाऱ्या खर्चास महापालिका सर्वसाधारण सभेने देखील मान्यता दिली होती. इमारतीची निविदा प्रक्रियाही राबविली होती. त्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे आग्रही होते. मात्र, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेची प्रशस्त आणि देखणी इमारत दर्शनी भागात असावी, अशी सूचना केली.

हेही वाचा: पुण्याच्या मैथिलीची हार्वर्डमध्ये निवड

त्यामुळे गांधीनगरमध्ये महापालिका भवन उभारणीचा प्रस्ताव बारगळला. आता, त्या जागेत महापालिकेच्या अग्निशामक दलाचे मुख्यालय उभारले जाणार आहे. महापालिका भवनासाठी नेहरूनगर, पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एच.ए) कंपनीची जागा ताब्यात नसल्याने ते ठिकाणही रद्द केले. मोरवाडीतील पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगतची गरवारे कंपनीची ‘आयटूआर’ अंतर्गत ताब्यात आलेली जागेचीही पाहणी केली. मात्र, त्यास पसंती मिळाली नाही.

हेही वाचा: नियोजन समितीवरील सदस्यांची नियुक्ती; आमदार, खासदारांसह तीस सदस्यांचा समावेश

अखेरीस ऑटो क्लस्टर येथील महापालिकेच्या जागेत महापालिकेची नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हिरवा कंदील दर्शविला आहे. इमारतीच्या बांधकामाचा आराखडा तयार करणे, बांधकाम परवानगी घेणे, स्ट्रक्चरल डिझाइन, सखोल अंदाजपत्रक, निविदा संदर्भात आणि निविदा पश्चात कामे करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करणार आहे. यासाठी १ जूनला नोटीस प्रसिद्ध केली होती.

या कामासाठी चार एजन्सीने दर सादर केले होते. त्यापैकी सुनील पाटील असोसिएट्स यांनी १.९५ टक्के इतका लघुत्तम दर सादर केला. निविदापूर्वी कामासाठी स्वीकृत निविदा रक्कमेच्या ०.५० टक्के तर, निविदा पश्चात कामांसाठी निविदा रकमेच्या १.४५ टक्के एवढे शुल्क देणार आहे. या प्रस्तावास स्थायीने मान्यता दिली आहे.

उर्वरित जागेत सिटी सेंटर

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर, सायन्स पार्क, तारांगण हे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. तसेच, या मार्गावर बीआरटीचा प्रशस्त मार्ग आहे. महापालिकेची याठिकाणी ३५ एकर जागा आहे. त्यापैकी ७ एकर जागेत १३ मजली प्रशस्त पर्यावरणपूरक इमारत उभारणार आहे. त्यात महापालिकेचे सर्व विभागांसह महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांची दालने असणार आहेत. तसेच, प्रशस्त सभागृह, मीटिंग हॉल, कॅन्टीन, स्वच्छतागृह आणि इतर अद्ययावत अशा सोयी असणार आहेत. उर्वरित जागेत सिटी सेंटर उभारणार आहे.

loading image