PCMC
PCMC sakal

पिंपरी : काहींच्या तयारीवर पाणी; काहींना दिलासा

पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी महिला आरक्षणाची सोडत निघाल्यामुळे निवडणुकीचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले.
Summary

पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी महिला आरक्षणाची सोडत निघाल्यामुळे निवडणुकीचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले.

पिंपरी - महापालिका निवडणुकीसाठी महिला आरक्षणाची सोडत निघाल्यामुळे निवडणुकीचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. अनेक दिग्गजांच्या प्रभागातील तीनपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांना नवीन प्रभाग शोधावा लागेल. अन्यथा घरातील महिलेला रिंगणात उतरवावे लागेल. काहींनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या तयारीवर पाणी फिरले आहे.

प्रभाग एक तळवडेमधील दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. गेल्या वेळी या प्रभागात (तेव्हाचा प्रभाग १२) चारही सदस्य राष्ट्रवादीचे होते. यात भालेकर बंधूंचा समावेश होता. प्रभाग सात भोसरी सॅंडविक कॉलनीमधील दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा हा भाग बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथून चार वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. प्रभाग आठ भोसरी गावठाण- गवळीनगर- शीतलबागमधील दोन जागाही सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. या प्रभागात भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे निवासस्थान आणि संपर्क कार्यालयही आहे. गेल्या वेळी येथून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले होते.

प्रभाग १७ संत तुकारामनगरमधील एक जागा एससीसाठी व एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे. येथे राष्ट्रवादीचे माजी महापौर योगेश बहल यांचा संपर्क असून एकच जागा खुली राहात असल्याने येथून चुरस वाढणार आहे. प्रभाग १८ मोरवाडी- खराळवाडीतील एक जागा एससी व एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे येथेही चुरस वाढणार असून काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम येथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, खुली जागा एक आणि इच्छुक जास्त असल्याने चुरस वाढणार आहे. मासुळकर कॉलनी व खराळवाडी अशी थेट मतांची विभागणी होऊ शकते. सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर यांचा संपर्क असलेला चिंचवड स्टेशन-मोहननगर प्रभाग एससी व सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. प्रभाग २७ चिंचवडगाव, प्रभाग ३० पिंपरीगाव, प्रभाग ३१ काळेवाडी, प्रभाग ४० पिंपळे सौदागर, प्रभाग ४२ कासारवाडी येथील प्रत्येकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे येथून प्रत्येकी दोन नगरसेविका असतील. प्रत्येकी एका जागेवर पुरुषांमध्ये चुरस बघायला मिळेल. कदाचित या प्रभागातून नवख्या उमेदवारांना संधी मिळू शकते. केशवनगर प्रभाग २८ व रहाटणी प्रभाग ३३ मध्ये पुरुषांना संधी आहे. प्रत्येकी केवळ एकच जागा महिलांसाठी आरक्षित आहे.

यांना मिळाला दिलासा

भाजपचे माजी महापौर राहुल जाधव यांचा प्रभाग तीन जाधववाडी, माजी महापौर नितीन काळजे यांचा प्रभाग पाच चऱ्होलीतील केवळ एकेक जागाच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली आहे. दोन जागा खुल्या राहिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय, अन्य इच्छुकांचाही जीव भांड्यात पडला आहे. स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी यांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, त्यांचा जनसंपर्क असलेल्या इंद्रायणीनगर प्रभागाला लांडेवाडी जोडल्याने काही अंशी त्यांची धाकधूक वाढली आहे. स्थायीच्याच माजी सभापती सीमा सावळे यांचा संपर्क असलेला बालाजीनगर प्रभाग एससी व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांनाही दिलासा मिळाला आहे.

प्रभाग १५ मधील केवळ एकच जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे भाजपचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांना दिलासा मिळाला आहे. दोघांनीही भोसरी विधानसभेची निवडणूक लढविली आहे. प्रभाग २३ प्राधिकरणातील केवळ एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाली आहे. त्यामुळे माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांच्यासह अन्य इच्छुकांनाही चांगली संधी मिळाली आहे. प्रभाग २६ बिजलीनगर भोईरनगरमधीलही एकच जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे भाजपचे माजी पक्षनेते नामदेव ढाके व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांना दिलासा मिळाला आहे. माजी महापौर उषा ढोरे यांचा प्रभाग ४६ चार सदस्यांचा झाला आहे. तेथील एक जागा एससीसाठी व दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे ढोरे यांचा मार्ग मोकळा झाला असून, खुल्या जागेवर मात्र पुरुषांमध्ये चुरस बघायला मिळेल. येथून राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे व माजी नगरसेवक हर्षल ढोरे इच्छुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com