महापालिका शाळेतील २८८ जणांवर अन्याय; विद्यार्थी बक्षिसांच्या प्रतिक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pcmc

कोरोना काळात चांगल्या गुणांनी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले शेकडो विद्यार्थी २५ हजार ते एक लाख रुपये बक्षीसाच्या प्रतिक्षेत दोन वर्षांपासून आहेत.

PCMC News : महापालिका शाळेतील २८८ जणांवर अन्याय; विद्यार्थी बक्षिसांच्या प्रतिक्षेत

पिंपरी - कोरोना काळात चांगल्या गुणांनी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले शेकडो विद्यार्थी २५ हजार ते एक लाख रुपये बक्षीसाच्या प्रतिक्षेत दोन वर्षांपासून आहेत. यासाठी पालक आणि विद्यार्थी शाळा आणि नागरवस्ती विभागाच्या पायऱ्या झिजवत आहेत. दुसरीकडे मात्र खासगी शाळेतील ५ हजार २४९ विद्यार्थ्यांच्या खात्यावर सव्वा नऊ कोटी रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम जमा केली आहे. मग, महापालिकेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय का? असा सवाल पालकांचा आहे.

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील दहावी उत्तीर्णपैकी २८८ विद्यार्थी बक्षीसपात्र ठरले होते. त्यापैकी २८ विद्यार्थी लाखाचे मानकरी होते. तर ५० हजारांसाठी ८३ विद्यार्थी, २५ हजार बक्षीसासाठी १६२ आणि १५ दिव्यांग विद्यार्थी ५० हजार बक्षीसासाठी पात्र होते. मात्र, प्रशासनाने बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे म्हणून म्हणून बक्षीस रक्कम नाकारली आहे. मात्र, खासगी शाळेतील ५ हजार २४९ विद्यार्थ्यांना सव्वानऊ कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम खात्यावर जमा केली आहे.

बक्षीस न देण्याचे कारण

जे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत ८५ ते ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवितात. त्यांना अनुक्रमे ५० हजार आणि १ लाख रुपये अशी रक्कम माध्यमिक विभागामार्फत बक्षीस म्हणून देण्यात येते. परंतु, कोरोनामुळे माध्यमिक शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिके यांवर अंतर्गत मूल्यमापन करून निकाल काढण्यात आला. परिणामी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामधील बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या तब्बल २८८ झाली. हे कारण देऊन बक्षिस देण्यास नकार दिला आहे.

पहिले पाढे पंचावन्न

महापालिकेने २०२०-२१ प्रमाणेच २०२१-२२च्या विद्यार्थ्यांच्या तोंडालादेखील पाने पुसली आहेत. यावर्षी महापालिकेचे १५० विद्यार्थी बक्षीसपात्र आहेत. ७ विद्यार्थी एक लाखाचे मानकरी ठरले आहेत. तर ५० हजारासाठी ४६ विद्यार्थी, २५ हजार रुपये बक्षीसासाठी ८७ आणि १० दिव्यांग विद्यार्थी ५० हजार बक्षीसासाठी पात्र होते. या विद्यार्थ्यांसाठी ५६ लाख ७५ हजार रुपये अंदाजे इतका खर्च येईल, मग सव्वा ९ कोटी रुपयांच्या तुलनेत ५६ लाख ७५ हजार रुपये कमी आहे. मग महापालिकेच्या १५० विद्यार्थ्यांना बक्षिसापासून वंचित ठेवण्याचे कारण काय?, असाही सवाल पालकांचा आहे.

महापालिकेच्या शाळेत शिकणारे आम्ही खासगी शाळांच्या तुलनेत गरीब कुटुंबातील गरजू व कष्टकरी कामगारांची मुले आहोत. आमच्या पुढच्या शिक्षणासाठी बक्षीस मिळणे आवश्‍यक आहे.

- प्रतीक तुपे, विद्यार्थी, मोहननगर

तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिके यांवर अंतर्गत मूल्यमापन करून निकाल काढला, तर यात महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्याचा दोष काय? आम्ही पण मेहनत केली आहे.

- फरहत अन्सारी, विद्यार्थिनी आकुर्डी