पिंपरी-चिंचवड शहरात श्‍वान नसबंदीसाठी 999 रुपयांचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 February 2021

शहरात मोकाट कुत्र्यांचा (श्‍वान) उपद्रव वाढला आहे. त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडून श्‍वान संततीनियमन व निर्बिजिकरण शस्त्रक्रिया केल्या जातात.

पिंपरी : शहरात मोकाट कुत्र्यांचा (श्‍वान) उपद्रव वाढला आहे. त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडून श्‍वान संततीनियमन व निर्बिजिकरण शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेकडील नोंदणीकृत संस्थांना काम दिले जाते. त्यानुसार सध्याच्या तीन संस्थांना प्रतिश्‍वान शस्त्रक्रिया खर्च 999 रुपयांप्रमाणे दिला जात आहे. त्यांना एक महिना किंवा नवीन संस्थांची नेमणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्यास महापालिका स्थायी समिती सभेने मंजुरी दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवी मुंबईतील ऍनिमल वेल्फेअर असोसिएशन, लातूर येथील सोसायटी फॉर दी प्रिव्हेशन ऑफ क्रुएल्टी टु ऍनिमल आणि सातारा येथील जेन्सी स्मीथ ऍनिमल वेल्फेअर ट्रस्ट यांच्यातर्फे शहरातील श्‍वानांची संततीनियमन व निर्बिजिकरण शस्त्रक्रिया केली जात आहे. त्यांची दोन वर्षांची मुदत 16 जानेवारी रोजी संपली आहे. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. 

वाचनालय मुदतवाढ 
महापालिकेचे चिंचवड येथील केशवनगरमध्ये पु. ल. देशपांडे वाचनालय आहे. वाकड येथील मराठी देशा फाउंडेशनला ते चालविण्यास दिले होते. त्यांना ऑक्‍टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यापोटी त्यांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. मात्र, फाउंडेशनने 55 महिने मुदतवाढ मिळण्याची विनंती केली आहे. 

'तालेरा'साठी साडेसहा कोटी 
महापालिकेच्या चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचे काम फेब्रुवारी 2018 पासून सुरू आहे. त्यासाठी 39 कोटी 23 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, बांधकामात वाढ केल्याने खर्चही 45 कोटी 56 लाख रुपये अपेक्षित खर्च धरला आहे. त्यापोटी व रुग्णालयाची कामे करण्यासाठी वाढीव सहा कोटी 42 लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली. 

काश्‍मीर सहल खर्च मंजूर 
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्या 'इ' क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील 16 नगरसेवक व चार अधिकारी जम्मू-काश्‍मीरच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. यामध्ये शहर स्वच्छता, कचरा विल्हेवाट, शाळांमधील स्वच्छता प्रकल्प, पर्यटन स्थळावरील स्वच्छता नियोजन आदींचा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्यात आली. 

पिंपळे गुरव शाळा विस्तार 
महापालिकेच्या पिंपळे गुरव येथील शेवंताबाई जगताप शाळेचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी दोन कोटी 98 लाख रुपये खर्च अपेक्षित असून देव कन्स्ट्रक्‍शन या ठेकेदार कंपनीची निविदा पात्र ठरली आहे. त्यांना काम देण्यास व त्यासाठीच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation standing committee approval to dog sterilization for 999 rupees