भोसरी : महापालिकेकडून होणार बाप्पाचं विसर्जन 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी यंदा गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्र, घाट, विहिर, हौद आदी ठिकाणी करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने बंदी घातली आहे.

भोसरी : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी यंदा गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्र, घाट, विहिर, हौद आदी ठिकाणी करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने बंदी घातली आहे. महापालिकेद्वारे विसर्जनासाठी प्रत्येक प्रभागात गणेश मूर्त्यांचे संकलन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात दोन फिरते गणपती संकलन व्हॅन ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापिलकेद्वारे देण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी सर्वच मंडळाद्वारे रस्त्यावर मांडव न घालता साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशाच्या विसर्जनासाठी महापालिकेद्वारे प्रत्येक प्रभागात विसर्जन हौद बांधण्यात येतो. त्याचप्रमाणे निर्माल्य कुंडही विसर्जन घाटावर ठेवण्यात येत होता. मात्र, या वर्षी कोरोनामुळे महापालिकेद्वारे हौद बांधण्यात आलेले नाहीत.  

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेद्वारे  नागरिक आणि मंडळांना कमी उंचीचे शाडू मातीचे गणपती बसविण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, बाजारपेठेत प्लॅस्टर ऑफ पॅरिसचेही गणपती मोठ्या  प्रमाणात उपलब्ध झाल्याने शहरातील बऱ्याच मंडळासह नागरिकांनीही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींची विधिवत पूजेने प्रतिष्ठापना केली. आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती पाण्यात विरघळत नसल्याने या गणपतीचे घरात अथवा ड्रमच्या पाण्यात कसे विसर्जन करावे हा प्रश्न नागरिकांसमोर होता. याबद्दल काही नागरिकांनीही शंका उपस्थित केली होती. याचा विचार करत महापालिकेने शहर परिसरात फिरते वाहन ठेवून विसर्जनासाठीचे गणपती संकलन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रत्येक प्रभागात गणपती संकलनासाठी दोन व्हॅन ठेवण्यात येणार आहेत. घरात गणपती विसर्जनासाठी अडचणी येणाऱ्या नागरिकांनी त्यांचे गणपती संकलन व्हॅनमध्ये जमा करावेत. त्याचप्रमाणे नागरिकांची मागणी वाढल्यास गणपती संकलन व्हॅनची संख्या वाढविण्यात येईल.

- संजय घुबे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation will accept ganpati for immersion