ज्येष्ठांचा मृत्यू रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका राबविणार हा 'अॅक्शन प्लॅन'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

  • महापालिकेचे धोरण
  • स्वयंसेवकांच्या माध्यमातून ज्येष्ठांची काळजी 

पिंपरी : अन्य आजार व त्यात कोरोना यामुळे गेल्या सहा महिन्यांत सर्वाधिक मृत्यू साठ वर्षांवरील रुग्णांचे झाले आहेत. ते रोखण्यासाठी महापालिकेने त्रिसूत्री कार्यक्रम आखला आहे. यात 'तत्काळ तपासणी व उपचार', 'लक्ष्यपूर्ती व त्वरीत शोध' आणि 'स्वयंसेवकांकडून जागृकता' यांचा समावेश आहे. 

'पवना जलवाहिनीचं काम सुरू केल्यास...', माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी दिला इशारा

कोरोना काळात शहरातील एक हजारावर व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यात मधूमेह, किडनी, हृदयविकार, फुफ्फुस, श्‍वसनाचे विकार असलेल्यांची संख्या ऐंशी टक्के आहे. मात्र, एकूण मृतांमध्ये ज्येष्ठांची संख्या 70 टक्‍क्‍यांवर आहे. त्यांच्यासह अन्य मृत्यू रोखण्यासाठी महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, "मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी साठ वर्षांवरील नागरिक व अन्य आजाराने पीडित रुग्ण शोधले जात आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विशेषतः कंटन्मेंट झोनवर लक्ष केंद्रीत केले आहे. अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तत्काळ तपासणी केली जात आहे. त्यासाठी स्वयंसेवकांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक संघांशी संपर्क साधला जात आहे. लक्षणे नसलेल्यांना होम आयसोलेट केले जात आहे. अशा चाळीस-पन्नास वर्षांवरील व अन्य आजार असलेल्यांना रक्त तपासणीचा सल्ला दिला जात आहे. त्यात बदल आढळल्यास लवकर उपचार होऊन प्रकृती गंभीर होण्यापासून रोखता येते. यामुळे मृत्यूदर कमी होण्यासाठी मदत होईल.'' 

कोरोना काळातील सर्व मृत्यू 

  • शहरातील रुग्णालये : 893 
  • शहराबाहेरील रुग्णालये : 194 
  • शहरातील एकूण मृत्यू : 1087 

ज्येष्ठ नागरिकांची पंधरा मार्च रोजी बैठक झाली. त्यानंतर एकही बैठक किंवा कार्यक्रम झाला नाही. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग यावर अधिक भर दिला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांशी फोनवरच संपर्क साधत आहोत.
- जयवंत भोसले, ज्येष्ठ नागरिक संघ, बिजलीनगर 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी "त्वरीत तपासणी, त्वरीत उपचार' केले जात आहेत. त्यांच्यासह अन्य रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जनजागृती सुरू आहे. प्रतिकार क्षमता वाढल्याने शरीरच स्वतःचे रक्षण करू शकेल. स्वयंसेवकांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधला जात आहे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation's action plan to prevent the death of senior citizens