पिंपरी-चिंचवड महापालिकेचा गणेशमूर्ती दान स्वीकारण्यासाठी मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

नदी घाट, तलाव व विहिरींमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यास महापालिका प्रशासनाने बंदी घातली आहे.

पिंपरी : नदी घाट, तलाव व विहिरींमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यास महापालिका प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे शाडूच्या मूर्ती विसर्जन करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर उपाय म्हणून स्वयंसेवी संस्थांना मूर्ती दान स्वीकारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता योग्य ती दक्षता घेऊन गणेश विसर्जनाबाबत सुयोग्य असे नियोजन करण्याबाबत महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सर्व क्षेत्रिय अधिकारी, क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, अतिरिक्त आयुक्त अजित पवार व संतोष पाटील यांची ऑनलाइन मिटींग घेऊन गणेश विसर्जनाबाबत सध्याची स्थिती जाणून घेतली. क्षेत्रिय स्तरावर असणाऱ्या अडचणी समजून घेऊन समस्यांचे निराकरण करून देण्यात आले आहे. तसेच, गणेश विसर्जनाबाबत खालीलप्रमाणे सुचना देण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा झाला निर्णय...

  • घरगुती गणपती दान स्वरूपात स्वीकारणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना व त्यांच्या वाहनांसाठी फक्त पाच व्यक्तिंकरीता संबंधित क्षेत्रिय अधिकारी परवानगी देतील.  
  • ज्या स्वयंसेवी संस्था गणेश विसर्जनासाठी वाहनांवर पाण्याची टाकी बसविणार आहेत. त्यांना देखील संबंधित क्षेत्रिय अधिकारी परवानगी देतील. तसेच, गरज भासल्यास घरगुती स्वरुपातील श्रीगणेशाचे दान व निर्माल्य गोळा करण्यासाठी तशा पध्दतीची व्यवस्था क्षेत्रिय कार्यालय स्तरावरून करण्यात येईल.
  • स्वयंसेवी संस्थांनी संकलित केलेल्या गणेशमूर्ती व निर्माल्य याचे विसर्जन करण्याची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात येईल. 
  • महापालिकेच्या एकूण ३२ प्रभागांसाठी प्रत्येक प्रभागामध्ये एक कनिष्ठ अभियंता यांची स्वयंसेवी संस्थांसोबत समन्वयक म्हणून नेमणुक करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत संपूर्ण गणेश विसर्जन कार्यक्रमावर ते देखरेख ठेवण्यात येणार आहे. 

पदाधिकाऱ्यांचे आवाहन...

शहरावर आलेले कोरोनाचे संकट पाहता या गणेशोत्सव कालावधीत सर्व शहरवासीयांनी आपली व इतरांची काळजी घेऊन हा उत्सव साजरा करावा. तसेच, महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation's taking decision to accept ganeshmurti donation