'स्थायी'च्या अध्यक्षपदासाठी भाजपची आज कसोटी; राष्ट्रवादीला चमत्काराची आशा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 March 2021

  • ‘स्थायी’च्या अध्यक्ष निवडणुकीत चमत्काराची राष्ट्रवादीला आशा 

पिंपरी : महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (ता. ५) निवडणूक होणार आहे. सत्ताधारी भाजपकडे बहुमत आहे. मात्र, त्यांच्यातील नाराज रवी लांडगे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिलेला असल्याने विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भाजपमधील नाराज, शिवसेना व अपक्षांच्या मदतीने आपलाच अध्यक्ष होईल, असा त्यांचा दावा आहे. किमान अटीतटीची लढत घडवून आणायची अशी रणनीती आहे. त्यामुळे लांडगे यांची समजूत काढणे, अन्य नाराज व अपक्ष सदस्याला सांभाळणे, अशा भूमिकेत सत्ताधारी भाजपची कसोटी लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपकडून भोसरीतील नगरसेवक अॅड. नितीन लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून तळवडेतील नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. स्थायी समितीतील पक्षीय बलाबल विचारात घेता १६ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक १० सदस्य आहेत. अपक्ष एक सदस्यही भाजप समर्थक आहे. यात नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे यांचा समावेश आहे. त्यातील लांडगे बंधूंसह काटे व भोईरही अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. संधी मात्र नितीन लांडगे यांना मिळाली. त्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करत रवी यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, महापौरांनी तो गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत मंजूर केलेला नव्हता. स्थायी समितीच्या अन्य सदस्यांमध्ये राष्ट्रवादीच्या पौर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर; शिवसेनेच्या मीनल यादव व अपक्ष नीता पाडाळे यांचा समावेश आहे. 

दुपारी बारा वाजता निवडणूक 
महापालिकेतील मधुकरराव पवळे सभागृहात शुक्रवारी (ता. ५) दुपारी बारा वाजता स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची पीठासन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे. 

गुप्त मतदान घेण्याची मागणी 
स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया आवाजी मतदानाऐवजी गुप्त मतदानाद्वारे घ्यावी, अशी मागणी महापालिका माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे काही सदस्य राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करणार आहेत. परंतु, आवाजी मतदान प्रक्रियेमुळे ते धास्तावले आहेत. त्यामुळे गुप्तपद्धतीने मतदान घेण्यात यावे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा मागे घेण्याबाबत रवी लांडगे यांना समजावण्याचा प्रयत्न पक्षाचे वरिष्ठ नेते करीत आहेत. महापौरांनी त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. ते भाजपचे नगरसेवक आहेत. भाजपमध्येच राहतील आणि भाजपचाच अध्यक्ष होईल.’’ 
- नामदेव ढाके, सत्तारूढ पक्षनेते, महापालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal standing committee chairman elections will be held on friday