महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करणाऱ्यांचा कुटील डाव हाणून पाडणार : अजित गव्हाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Gavhane

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले.

Pimpri News : महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करणाऱ्यांचा कुटील डाव हाणून पाडणार : अजित गव्हाणे

पिंपरी - भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राला चुकीच्या दिशेने नेलं जातात आहे. मतं मागताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांची नावे घेतात. पण नंतर याच महापुरुषांचा सर्रास अपमान करून राज्यातील वातावरण बिघडविण्याचे काम भाजपा करत आहे. मात्र, महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करणाऱ्यांचा कुटील डाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाणून पाडणार आहे, असा सज्जड इशारा पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मंगळवारी (ता. २२) दिला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पिंपरीतील डॉ. बाबासाहेबआंबेडकर चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनात कोश्यारी यांच्या निषेधाची फलके लावून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी महापौर मंगला कदम, भाऊसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतीश काळे यांनीही कोश्‍यारी यांचा निषेध केला.

अजित गव्हाणे म्हणाले की, महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकरांचा आहे. लोकांचं राज्य पहिल्यांदा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. अशा आदर्श छत्रपती शिवरायांचा अपमान करणं, चुकीची वक्तव्य करणं हे वारंवार आणि जाणून बुजून भाजपकडून केलं जात आहे. या प्रकाराकडे शहरातील भाजपच्या आमदार, खासदारांनी दुर्लक्ष करण्याऐवजी आपली भुमिका स्पष्ट करावी. सत्तेवर आल्यानंतर याच महापुरुषांचा अपमान पाहूनही मूग गिळून गप्प बसतात. त्यामुळे या लोकांना याबद्दल जाब विचारायलाच हवा.

भाजपने राज्यपालांना वाट्टेल ते बोलण्याची जणू मुभाच दिल्याचे दिसत आहे. बेताल बडबड करून राज्यातील वातावरण बिघडविण्याचे काम ते करत आहेत. राज्यपालच नव्हे तर सुधांशु त्रिवेदी, गोपीचंद पडळकर यांच्याकडूनही वातावरण दूषित करण्याचा डाव त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून दिसून येत आहे. यापुढे आम्ही असली बेमुर्वत भाषा खपवून घेणार नाही, असा इशारा गव्हाणे यांनी दिला.

या आंदोलनात माजी नगरसेवक राहुल भोसले, प्रशांत शितोळे, फजल शेख मंगला कदम, भाऊसाहेब भोईर, विनोद नढे, कविता आल्हाट, पंकज भालेकर, शाम लांडे, मोरेश्वर भोंडवे, प्रवीण भालेकर, माया बारणे, प्रसाद शेट्टी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.