
Pimpri Chinchwad : ‘एचसीएमटीआर’वर मेट्रो धावणार
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चक्षमता द्रुतगती मार्गावर (एचसीएमटीआर) मेट्रो प्रकल्प राबविण्याचे विचाराधीन आहे. पिंपरी-चिंचवडमधील विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम मेट्रोने सुरू केले आहे. पुण्यातील मार्गाचाही डीपीआर केला जाणार आहे, असे पुणे मेट्रोचे संचालक (कार्य.) अतुल गाडगीळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा: दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी ‘एसआयए’ स्थापण्यास परवानगी
मेट्रोच्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कामाच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी फुगेवाडी येथील कार्यालयात गाडगीळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाव्यवस्थापक (जनसंपर्क) हेमंत सोनवणे उपस्थित होते. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात एचसीएमटीआर मार्ग गेल्या वीस वर्षांपासून प्रस्तावित आहे. भोसरी, कासारवाडी, दापोडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी फाटा, थेरगाव, वाल्हेकरवाडी, आकुर्डी- निगडी- प्राधिकरण, स्पाइन रस्ता - भोसरी असा ३६ किलोमीटर लांबीचा एचसीएमटीआर मार्ग आहे. या मार्गावरील मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी मेट्रोने डीपीआर तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्ग आणि ‘एचसीएमटीआर’ मार्गावरील गावांसह लगतची सांगवी, पिंपळे निलख, वाकड, ताथवडे, चिंचवड, तळवडे, चिखली, मोशी, चऱ्होली, दिघी ही गावे मेट्रोला जोडली जाणार आहेत.
अतुल गाडगीळ म्हणाले...
स्वारगेट- पिंपरी मेट्रो मार्गाचा निगडीपर्यंत विस्तार करण्यासाठी ‘डीपीआर’ तयार केला होता. त्याला राज्य सरकारची परवानगी मिळाली असून अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. पिंपरीपासून निगडीपर्यंतचे अंतर साडेचार किलोमीटर आहे.
नाशिक फाटा ते चाकण प्रस्तावित मेट्रो मार्गाचा डीपीआर राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला आहे.
नाशिक फाटा येथे उभारलेल्या मेट्रो स्थानकाचे नाव मूळ डीपीआरनुसार भोसरी आहे. त्यात भविष्यात बदल केला जाईल. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेईल.
शहरातील सर्व मेट्रो स्थानके पीएमपी बससेवेने जोडले जाणार आहेत. त्यासाठीची स्थानके मेट्रो उभारणार असून बसमार्ग पीएमपी व महापालिका ठरवणार
आतापर्यंत ६५ टक्के काम झाले आहे. लवकरच प्रवाशांसाठी कार्यान्वित होणार आहे. पिंपरी ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यानचे काम पूर्णत्वाकडे आहे.
डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पूर्ण क्षमतेने मेट्रो धावेल.
हेही वाचा: ४० हून जास्त जिल्हे पिछाडीवर; पंतप्रधान घेणार आज लसीकरणाचा आढावा
दृष्टिक्षेपात मेट्रो (पुणे-पिंपरी चिंचवड))
स्थानके - ३०
लांबी - ३३.१ कि.मी.
पिंपरी ते स्वारगेट - १७.४ कि.मी.
वनाज ते रामवाडी - १५ कि.मी.
एकूण २२६१ झाडांचे पुनर्रोपण
मेट्रोने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाचा हरित उपक्रम हाती घेतला आहे. सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर, पावसाचे पाणी साठवण, बायोडायजेस्टर, वृक्षारोपण, पुनर्रोपण, हरित इमारती असे धोरण आहे. मेट्रो मार्गिकसाठी एकही झाड तोडलेले नाही. रूटबॉल तंत्रज्ञानाद्वारे झाडांचे पुनर्रोपण केले आहे. आतापर्यंत दोन हजार २६१ झाडांचे पुनर्रोपण केले आहे. १५ हजारांवर नवीन झाडे लावली आहेत. प्रत्यारोपणानंतर ८० टक्क्यांहून अधिक झाडे जगली आहेत.
Web Title: Pimpri Chinchwad Pune Metro Run Hcmtr Road
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..