esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्गाला लागत आहे ब्रेक

बोलून बातमी शोधा

Break the Chain
पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्गाला लागत आहे ब्रेक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाचे संसर्ग खंडित करण्यासाठी सरकारने पंधरा एप्रिलला ‘ब्रेक द चैन’ धोरण जाहीर केले. सोमवार ते शुक्रवार केवळ तीन तास किराणा व भाजी मंडईला परवानगी दिली. शनिवार व रविवारी कडकडीत विकेंड लॉकडाउन पाळले जात आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कारण, गेल्या दहा दिवसांत संसर्गाचे प्रमाण स्थिर राहिल्याचे महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

‘ब्रेक द चैन’ धोरण जाहीर करण्यापूर्वी संसर्गाचा आकडा सातत्याने वाढत होता. कोरोना साखळी खंडित करण्यासाठी महापालिका व सरकार विविध उपाययोजना राबवीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून खासगी रुग्णालयांना कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. असे १२९ खासगी रुग्णालये शहरात असून, त्यांची एकूण बेड संख्या सात हजार २४६ आहे. यात १०१ कोविड केअर सेंटर आहेत. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर येथे उपचार केले जात आहेत. गेल्या आठवड्यात महापालिकेच्या वायसीएमसह जिजामाता, नवीन भोसरी, नेहरूनगर व ऑटो क्लस्टर येथील जम्बो कोविड रुग्णालय व खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नव्हते. त्यातही ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्ण प्रतिक्षेत होते. परंतु, आता परिस्थिती काही प्रमाणात बदलली असून, ‘ब्रेक द चैन’ धोरणाचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. गेल्या दहा दिवसांत संसर्गाचे प्रमाण स्थिर झाल्याचे दिसत आहे. शिवाय, खासगी रुग्णालयांत एक हजार ६८७ बेड उपलब्ध आहेत. शिवाय टेस्‍टिंग, ट्रेसिंग व ट्रिटमेंटचे प्रमाण वाढल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्याही वाढलेली दिसते. कारण, सोमवारी दुपारी २५ हजार २१ सक्रिय रुग्णांपैकी २१ हजार ८६७ रुग्ण लक्षणे नसलेली होती. केवळ तीन हजार १५४ रुग्णांमध्ये लक्षणे होती.

हेही वाचा: 'रेमडेसिव्हिर'चा काळाबाजार; नगरसेविकेच्या मुलाला अटक

गेल्या दहा दिवसांत बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या आठवड्यात सर्व रुग्णालये फुल्ल झाली होती. बेड मिळत नव्हते. आता पॅनिक स्थिती नाही. बेड उपलब्ध होत आहेत. व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या अवघी पाच टक्के आहे. नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करून लवकर बरे होता येईल.

- शिरीष पोरेडी, प्रवक्ता, महापालिका

बाधितांपेक्षा बरे झालेले दुप्पट

कोरोना संसर्गावर मात करून बरे झालेल्यांची संख्या सोमवारी दुप्पट राहिली. शनिवारी (ता. २५) दुपारी चार ते सोमवारी (ता. २६) दुपारी चार या चोवीस तासांत एक हजार २९३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, तर कोरोनावर मात केलेल्या दोन हजार ४६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, रविवारी दिवसभरात नऊ हजार ५८३ संशयितांची तपासणी केली. शनिवारचे प्रतीक्षेतील मिळून आठ हजार १४४ मिळून १७ हजार ७२७ जणांचे अहवाल प्राप्त व्हायचे होते. त्यातील सहा हजार ८०० रिपोर्ट निगेटिव्ह आले. आठ हजार ६६२ रिपोर्ट प्रतीक्षेत राहिले होते. त्यात सोमवारी तपासलेल्या सात हजार ९२३ जणांची भर पडली. सर्व मिळून १८ हजार ५८५ पैकी सहा हजार १९२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. नऊ हजार शंभर जणांचे रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत, तर सोमवारी दुपारी चारपर्यंत नऊ हजार ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.