esakal | कारवाई शिस्तीसाठी की टार्गेटपूर्तीसाठी; वाहतूक पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

The Pimpri Chinchwad Transport Department is currently cracking down on motorists

नो पार्किंग, रॉंग साइड, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जोरदार कारवाया झाल्या.

कारवाई शिस्तीसाठी की टार्गेटपूर्तीसाठी; वाहतूक पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू

sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून सध्या वाहनचालकांवर जोरदार कारवाई सुरू आहे. चौकाचौकात वाहतूक पोलिसांचा मोठा समूह उभा असतो. वर्षभरातील इतर महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात चार ते पाच पटीने कारवाई वाढली. मात्र, एका महिन्यात अचानक कारवाई वाढल्याने शहरात नियम मोडणारे वाढले, की कारवाईचे वर्षभराचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियम मोडणाऱ्यांकडे करडी नजर गेली, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
 
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. यासाठी वाहतूक पोलिसांना कारवाईचे टार्गेटही दिले जाते. मात्र, लॉकडाउनमुळे वाहनेच रस्त्यावर नसल्याने कारवाई करणार कुणावर? अशी स्थिती झाली होती. मात्र, आता रस्त्यावर वाहने धावू लागली आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. मात्र, या वर्षभरात जेवढी कारवाई झाली नाही तेवढी कारवाई मागील एका महिन्यात झाली आहे. यावरून शहरात नियम मोडणारे वाढले, की टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलिसांची नियम मोडणाऱ्यांकडे करडी नजर गेली, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

नो पार्किंग, रॉंग साइड, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जोरदार कारवाया झाल्या. नो पार्किंगमध्ये वाहने लावल्याप्रकरणी जुलै महिन्यात पाच हजार 686, तर सप्टेंबरमध्ये सहा हजार 791 जणांवर कारवाई झाली. वर्षभरात सर्वाधिक कारवाई या दोन महिन्यात झाली. तसेच, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवरही सर्वाधिक कारवाईचा बडगा सप्टेंबर महिन्यांत उगारण्यात आला आहे. फेब्रुवारीनंतर थेट सप्टेंबर महिन्यातच या कारवाईने एक हजाराचा आकडा पार केला. तसेच, रॉंग साईडने वाहन चालविल्याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात तब्बल पाच हजार 402 जणांवर कारवाई झाली. 

कारवाईचा प्रकार जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर एकूण 

नो पार्किंग          247 150 51 00 1 50 2520 5686 6791 15496 
रॅश ड्रायव्हिंग      778 1010 826 23 15 119 241 438 1098 4558 
रॉंग साइड          2222 2603 1457 48 507 3352 2900 2956 5402 21447 
सीट बेल्ट          1818 1739 1345 36 00 495 1061 1581 1503 9658 
सिग्नल जंपिंग      1948 2528 2023 00 27 947 603 1288 2327 11691 
मोबाईल टॉकिंग   2661 3270 2325 24 12 512 728 1267 1999 12798


संपादन - सुस्मिता वडतिले