
Pimpri : स्थायी सभेचा उरकला ‘खेळ’
पिंपरी : लाच प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या महापालिका स्थायी समितीची बुधवारची (ता. ८) सभा सर्वपक्षीय सदस्यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्यामुळे गेले २१ दिवस आंदोलनाचे नगारे वाजविणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे सूर सत्ताधारी भाजपमध्ये मिसळून ‘खेळ’ खेळले की काय? अशी महापालिका वर्तुळात चर्चा आहे.
महापालिका स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ ऑगस्टला अटक केली होती. होर्डिंग ठेकेदाराकडून १० लाखाची मागणी करून एक लाख १८ हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सध्या सर्वजण जामिनावर आहेत. त्यानंतर अध्यक्ष लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली एक सप्टेंबर आणि आजची (ता. ८) साप्ताहिक सभा झाली.
एक तारखेच्या सभेवर विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहिष्कार टाकला होता. तर, शिवसेनेच्या सदस्या अनुपस्थित राहिल्या होत्या. आजच्या सभेला दोन्ही पक्षांचे अर्थात अनुक्रमे चार व एक असे पाच सदस्य उपस्थित होते. मात्र, त्यांनी लाचप्रकरणी ब्र ही काढला नाही, असे सूत्रांनी सांगितले. शहरातील अनियमित व अपुरा होणारा पाणीपुरवठा, डेंगीचा प्रादुर्भाव, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून शुल्क आकारणी करू नये, अशा विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला.
पीठासन अधिकारी लांडगे म्हणाले, ‘‘सर्व सदस्य उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झाली. ४३ कोटी ९८ लाख रुपयांच्या खर्चाचे ३५ विषय मंजूर झाले.’’ दरम्यान, लाचप्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीसह शिवसेनेने आंदोलन केले होते. प्रत्येक सभेच्या अगोदर आंदोलन करण्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. मात्र, बुधवारच्या (ता. ८) सभेत लाच प्रकरणाचा मुद्दा कोणत्याही सदस्याने उपस्थित केला नाही. त्यामुळे सभागृहाबाहेर एक व सभागृहात वेगळीच भूमिका विरोधकांकडून घेतली गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘घटनेचा आदर म्हणून उपस्थित राहिलो’
महापालिकेच्या इतिहासात स्थायी समिती लाच प्रकरण पहिल्यांदाच घडले आहे. हा लाजिरवाणा प्रकार आहे. समिती बरखास्त करून सर्व सदस्यांची चौकशी करा, अशी आमची मागणी होती. त्यात आमचे सदस्य दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची भूमिका होती. मात्र, सत्ताधारी भाजपने समिती बरखास्तीबाबत निर्णय घेतला नाही. उलट अध्यक्षांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्याच अध्यक्षतेखाली बैठक घेतली, असे सांगून विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ‘‘आम्हाला भाजपच्या पापाचे धनी व्हायचे नव्हते. म्हणून लाच प्रकरणानंतरच्या पहिल्या बैठकीला आमचे राष्ट्रवादीचे सदस्य अनुपस्थित राहिले होते.
राज्यघटनेचा आदर राखला जावा व शहरातील पाणीपुरवठा, डेंगीचा उद्रेक आदी विषयांना वाचा फोडावी, दोन दिवसांनी गणेशोत्सव सुरू होत आहे. योग्य नियोजन व्हावे, त्यावर चर्चा व्हावी, आमचे सदस्य बुधवारच्या बैठकीला उपस्थित राहिले. १ कोटी ७० लाख रुपयांचा ‘क्रिसिल’ सल्लागार नियुक्तीचा विषय रद्द करण्याची मागणी आम्ही केली आहे.’’