esakal | Pimpri : पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन की ऑफलाइन ?
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

Pimpri : पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन की ऑफलाइन ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: महापालिकेची ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने झाली होती. पीठासन अधिकारी महापौर उषा ढोरे यांनी अवघ्या आठ मिनिटांत २२ विषय मंजूर करून कामकाज संपविले होते. त्यावर विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने आक्षेप घेतला होता. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती.

त्यामुळे प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून अर्थात ऑफलाइन पद्धतीने सभा घेण्याबाबतचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठ दिवसांपूर्वी पुण्यात केले होते. मात्र, त्याबाबत अद्याप कोणतीही सूचना सरकारकडून महापालिकेला आलेली नसल्याने सप्टेंबर महिन्याची सभा ‘ऑनलाइन’ होणार की ‘ऑफलाइन’ होणार? याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, महापालिकांची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. ऑगस्ट महिन्याची सभाही महापौरांनी त्यांच्या कक्षातून ऑनलाइन घेतली होती. पदाधिकारी, गटनेते त्यांच्या कक्षातून, काही नगरसेवक स्थायी समिती सभागृहातून तर, काही नगरसेवक आपापल्या घरून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सहभागी झाले होते.

मात्र, २० ऑगस्टला झालेल्या या सभेच्या अवघे दोन दिवस अगोदरच अर्थात १८ ऑगस्टला महापालिका स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला होता. या लाच प्रकरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला होता. याच मुद्द्यावरून ते आक्रमक होते. मात्र, पीठासन अधिकारी ढोरे यांनी अवघ्या आठ मिनिटांत सभा उरकल्याने विरोधकांनी त्यांना घेराव घातला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनीही सभा ऑफलाइन घेण्याबाबत सूतोवाच केल्याने त्याबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फक्त चार सभा हाती

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची व त्यासाठीची आचारसंहिता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या दोन्ही महिन्यात सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता नाही. परिणाम, प्रत्येक महिन्याला एक सभा, यानुसार केवळ सप्टेंबर ते डिसेंबर या चार सभाच होणार आहेत. त्या ऑफलाइन पद्धतीने झाल्यास विरोधी पक्ष राष्ट्रवादी व शिवसेनेला सत्ताधारी भाजपला जाब विचारण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीच त्यांचा आग्रह ऑफलाइन सभा घेण्यासाठी आहे.

loading image
go to top