
पिंपरी : एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण
पिंपरी ः ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हेच ब्रीदवाक्य घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या लालपरीचे कर्मचारीच हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अडचणीत सापडले. आत्महत्या करणारे निघून जात आहेत, पण त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबापुढील प्रश्न अधिक वाढत आहेत. कर्मचारी या आर्थिक संकटाशी झुंजत आहेत. त्यांना परिवहन खात्याकडून आणि महाविकास आघाडी सरकारकडून सांत्वनाची नव्हे तर ठोस कृतीची गरज असल्याच्या प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी सोमवारी (ता.८) ‘सकाळ’शी बोलताना नोंदवल्या. एसटीचे राज्य शासनात विलनीकरण करावे, या मागणीसाठी ऐन सणासुदीत एसटी वल्लभनगर आगारातील २१९ कर्मचारी बेमुदत उपोषण करत आहे. त्याचा दळण-वळणावर मोठा परिणाम झाल्याने आगारात शुकशुकाट पहायला मिळाला.
वल्लभनगर आगारातील फाटकासमोर अश्विनी शिंदे, भरत वाघेला, अविनाश शेंडगे, ओमप्रकाश गिरी, सागर कुडे, बापुराव जाधव, दिलीप भोसले, विजय साबळे, सिदार्थ कोरे, दर्पना झेंडे, ज्योती शिंदे, अनुराधा विरकर, निलम कदम, मनिषा वाझे यांच्यासह या आगारातील २१९ कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. परिणामी सोमवारच्या मध्यरात्री बारानंतर आगारातून बससेवा बंद ठेवण्यात आली होती. आगारात येणाऱ्या प्रवाशांना फाटकावरील बोलक्या चित्रामुळे गर्दी नव्हती.
४९ एसटी बस बंद
या आगारातील कोल्हापूर, पणजी, हैदराबाद, गंगापूर, बिजापूर, कोकण, बेळगाव, बिजापूर, तिवरे, दापोली, महाड, उमरगा, मागजण या विविध मार्गावरील ४९ एसटी बस बंद होत्या. त्यामुळे साधारणतः दिवसागणिक मिळणाऱ्या ८ ते ९ लाखाच्या उत्पन्नावर झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन आता न्यायालयात गेले आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. ऐन सणाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी एसटीला राज्य सरकारने विलनीकरण करावे या प्रमुख मागणीसह २०१६ ते २०२० पर्यंतचे थकीत आर्थिक लाभ सेवानिवृत्त व सेवेतील कर्मचाऱ्यांना मिळावेत. तसेच ग्रेड पे, महागाई भत्ता, उचल, बोनससह वेतन वाढीच्या अशा विविध मागण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
आगारातील स्थिती; सहभागी कर्मचाऱ्यांची संख्या
प्रशासकीय -२६
कार्यशाळा -३२
चालक -७२
वाहक -८९
एकूण संख्या -२१९
‘‘राज्यात गेल्या वर्षभरात एस. टी. कर्मचाऱ्यांची ही ३७ वी आत्महत्या केल्या आहेत. कर्जबाजारीपणा आणि तोकडा पगार यामुळे ही आत्महत्या होत आहेत. राज्य शासनाने आम्हाला सामावून घ्यावे.’’
-प्रविण मोहिते, कामगार प्रतिनिधी
‘‘आत्महत्या घटना घडल्यावर महामंडळाचे अधिकारी सांत्वनापुरते जातात, नोकरी देण्याचे आश्वासने देतात. प्रत्यक्षात नोकरी मात्र एकाही वारसांना मिळालेली नाही. पीएफ आणि ग्रॅच्युइटीचा निधी मात्र कुटुंबास देण्यात आला, मात्र त्या तुटपुंज्या रकमेवर आयुष्य काढणे त्यांना कठीण आहे. ’’
-भरत वाघेला, कामगार प्रतिनिधी
‘‘कोरोना काळात आम्ही सेवा दिली. आम्हाला लांबपल्ल्याची नियुक्ती दिली जाते, त्यामुळे १२ तासांपेक्षा ड्युटी लावली जाते. कुटूंबाला वेळ देता येत नाही.’’
-मनिषा वाझे, महिला वाहक
‘‘सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करावा. या आंदोलनांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मागण्या पूर्ण करून प्रवाशांची सेवा पूर्ववत करावी. ’’
- हनुमंत गोसावी, आगारप्रमुख वल्लभनगर आगार