esakal | Pimpri : मोशीत इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग स्टेशन
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

Pimpri : मोशीत इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग स्टेशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील कुमार प्रिन्सविले सोसायटीत पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त समाजासाठी एक पाऊल उचलण्यात आले आहे. या सोसायटीमध्ये गो-ग्रीन या संकल्पनेला चालना देत नुकतेच इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग स्टेशन बसविण्यात आले आहेत. गो इ गो या नेदरलँड बेस्ड कंपनीच्या मदतीने व मार्गदर्शनाखाली सोसायटीच्या आवारात तीन चार्जिंग स्टेशनचे अनावरण करण्यात आले.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती व वायूप्रदूषणामुळे अनेक जणांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. परंतु, सध्या चार्जिंग स्टेशन जवळ नसल्याने लांब जावे लागते आणि चार्जिंग संपल्यावर काय करायचे, या समस्यांमुळे अनेकजण हा पर्याय निवडायला कचरत आहेत. परंतु सोसायटीमध्येच ही सुविधा उपलब्ध झाल्याने सदनिकाधारकांची समस्या सुटली आहे आणि पर्यायाने इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

ही वाहने जास्तीत जास्त वापरात आणली जावी व प्रदूषणाला काही अंशी आळा बसावा, या उद्देशाने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे संपूर्ण सोसायटी व आजूबाजूच्या परिसरातूनही स्वागत करण्यात आले. संपूर्ण शहरात सर्वप्रथम असे चार्जिंग स्टेशन सोसायटी आवारात बसविण्याचा मान कुमार प्रिन्सविले सोसायटीला मिळाला आहे.

कार्यक्रमाला गो इ गो नेटवर्कचे सदस्य शशांक कदम, मानवी रॉले त्यांचे इतर सहकारी आणि सोसायटीचे सदस्य, तुहीन रॉय, युवराज धनाल, प्रशांत जाधव, अनिमेश देवा, शिवाजी भंडलकर, लोकेश चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सोसायटी व्यवस्थापक रेखा नाईक यांनी केले.

loading image
go to top