esakal | प्रतिदिन तब्बल १४ टन ऑक्सिजनची पिंपरी महापालिकेकडून होते बचत
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen

प्रतिदिन तब्बल १४ टन ऑक्सिजनची पिंपरी महापालिकेकडून होते बचत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा (Shortage) निर्माण झाल्याने वीस दिवसांपूर्वी शहरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. अवघे काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन महापालिकेच्या (PCMC) वायसीएम 9YCM) व जम्बो कोविड रुग्णालयात (Jumbo Covid Hospital) शिल्लक होता. मात्र, प्रशासकीय पातळीवर सूत्रे हलली आणि ३२ टन ऑक्सिजन उपलब्ध झाला होता. या परिस्थितीतून धडा घेत महापालिका प्रशासनाने (Administrative) ऑक्सिजन वापराचे ऑडिट (Audit) केले आणि काही तांत्रिक बाबींमुळे वाया जाणाऱ्या ऑक्सिजनची बचत (Saving) करण्याचे धोरण अवलंबले. तेव्हापासून प्रतिदिन १३.५९ टन ऑक्सिजनची बचत होऊ लागली आहे. (Pimpri Municipal Corporation saves about 14 tons of oxygen per day)

महापालिकेच्या वायसीएम, ऑटो क्लस्टर व जम्बो कोविड रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होत होत्या. त्यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी २४ बाय ७ यंत्रणा उभारली. त्याद्वारे खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ लागला आहे. त्याचा वापर प्रभावीपणे होण्यासाठी बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यातील तृटी दूर केल्या व बारकाईने ऑक्सिजन वापर व बचतही होऊ लागल्याचे महापालिकेचे प्रवक्ता शिरीष पोरेडी यांनी सांगितले.

हेही वाचा: रेमडेसिव्हीरची २१ इंजेक्शन जप्त; केमिस्टसह तिघांना अटक

२० एप्रिलची काळरात्र

शहरातील रुग्णालयांतील रुग्णांसाठी २० एप्रिलच्या रात्री ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण झाली होती. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह नेहरूनगर येथील जम्बो रुग्णालय व ऑटो क्लस्टर रुग्णालयात अवघे काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक होता. ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून तो मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील व ऑक्सिजन पुरवठा समन्वय अधिकारी उपायुक्त स्मिता झगडे यांच्या पथकाने रातोरात प्रयत्न केले. सुमारे तीन टॅंकर अर्थात ३२ टन ऑक्सिजन २१ एप्रिलच्या पहाटे उपलब्ध झाला होता. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचवता आले. ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी शहराचे कारभारी म्हणून आमदार महेश लांडगे यांचाही हातभार लागला होता.

ऑक्सिजनचे ऑडिट

ऑक्सिजन तुटवड्यामुळे २० एप्रिल रोजी निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने तीन रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. यात वायसीएमसह नेहरूनगर जम्बो व ऑटोक्सटर रुग्णालयाचा समावेश होता. त्यासाठी बायोमेडिकल इंजिनिअरतर्फे ऑडिट करण्यात आले. त्यात काही रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून व्यवस्थित वापर होत नसल्याने ऑक्सिजन वाया जात असल्याचे आढळले. त्यावर उपाययोजना करण्यात आल्या आणि ऑक्सिजनची बचत होऊ लागली.

Oxygen

Oxygen

ऑडिटनंतरची स्थिती

ऑडिट पूर्वी नेहरूनगर जम्बो रुग्णालयात प्रतितास एक किलोलिटर ऑक्सिजन लागत होता. ऑडिटनंतर हे प्रमाण २५ टक्क्‍यांनी घटून ०.७५ किलोलीटरवर आले. हीच स्थिती ऑटो क्लस्टर व वायसीएम रुग्णालयातही दिसून आली. ऑडिटपूर्वी अनुक्रमे तिथे ०.२५ व ०.७५ किलोलिटर प्रतितास ऑक्सिजन लागत होता. ऑडिटनंतर हे प्रमाण अनुक्रमे ०.२३ व ०.५५ किलोलीटरवर आले. म्हणजेच तीनही रुग्णालये मिळून तासाला दोनऐवजी १.५३ किलोलिटर ऑक्सिजन वापर होऊ लागला. म्हणजेच ०.४७ किलोलिटर ऑक्सिजनची प्रतितास बचत होऊ लागली. २४ तासांसाठी हे प्रमाण ११.२८ किलोलिटर झाले. अर्थात प्रतिदिन १३.५९ टन ऑक्सिजनची बचत होऊ लागली.

रुग्णाच्या प्रकृतीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर कोविड सेंटर व वायसीएमच्या आवारात ऑक्सिजन टॅंक आहेत. प्रत्येक हॉस्पिटलला ऑडिट पूर्वी दररोज २३ ते २५ टन ऑक्‍सिजन लागत होता. आता हे प्रमाण १८ टनापर्यंत आले आहे. म्हणजेच प्रतिदिन सहा ते सात टन ऑक्सिजनची बचत होत आहे.

- शिरीष पोरेडी, प्रवक्ता, महापालिका

हेही वाचा: पुण्यात दररोज १२१० रुग्ण होताहेत कमी; आतापर्यंत ६६ हजार कोरोनामुक्त

ऑक्सिजन वाया जाण्याची कारणे

  • रुग्णाने ऑक्सिजन मास्क काढून बाजूला ठेवणे

  • बाथरूम किंवा स्वच्छतागृहात गेल्यास नोझल बंद न करणे

  • बोलताना, जेवण वा नाश्‍ता करताना ऑक्सिजन सुरूच राहणे

  • आवश्‍यकता नसताना ऑक्सिजन पाइपचा नोझल सुरूच राहणे

ऑक्सिजन बचतीसाठी उपाययोजना

  • प्रतिरुग्ण प्रतितास ऑक्सिजन वापराचे ऑडिट केले

  • ऑक्सिजनवरील रुग्णांवर लक्ष ठेवणे

  • ऑक्सिजन बेड व्यवस्थापन व नियोजन करणे

  • वापराअभावी वाया जाणाऱ्या ऑक्सिजनची बचत करणे