पिंपरीतील व्यावसायिकाचा खून कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यानेच केल्याचे उघड

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

पिंपरीतील व्यावसायिक आनंद उनवणे यांचे अपहरण आणि खून प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. कामावरून काढलेल्या एका कर्मचाऱ्याने चार जणांच्या मदतीने एक वर्षापासून कट रचून हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे.

पिंपरी - पिंपरीतील व्यावसायिक आनंद उनवणे यांचे अपहरण आणि खून प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. कामावरून काढलेल्या एका कर्मचाऱ्याने चार जणांच्या मदतीने एक वर्षापासून कट रचून हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

उमेश सुधीर मोरे (वय २८, रा. काळेवाडी), दीपक धर्मवीर चंडालिया (वय ३४, रा. रावेत), सागर दत्तात्रय पतंगे (वय २८, रा. कटफळ, ता. बारामती), बाबू उर्फ तुळशीराम नथुराम पोकळे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी खंडणीपोटी घेतलेले सोन्याचे दागिने कोणत्याही पावतीशिवाय खरेदी करणारे राकेश राजकुमार हेमणानी (वय २७, रा. पिंपरी), कपिल ग्यानचंद हासवाणी (वय ३०, रा. पिंपळे - सौदागर), प्रवीण नवनाथ सोनवणे (वय २२, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तर गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार प्रभू पुजारी हा अद्याप फरारी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आनंद साहेबराव उनवणे (वय ४२, रा. नर्मदा बिल्डिंग, नवीन म्हाडा वसाहत, मोरवाडी) असे अपहरण व खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. उनवणे यांचा पिंपरीत एफ.एफ. आय चीटफंड या नावाने व्यवसाय होता. ते कंपनीचे कार्यकारी संचालक होते. आरोपी प्रभू पुजारी हा उनवणे यांच्या चिटफंड कंपनीत मुख्य रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होता. त्याच्या वर्तणुकीवरून उनवणे यांनी त्याला एक वर्षापूर्वी कामावरून काढले होते. त्याचा राग पुजारी याच्या मनात होता. त्यावरून त्याने उनावणे यांना मारण्याचा तसेच त्यांच्याकडून मिळेल तेवढे पैसे उकळण्याचा कट रचला. त्याने अन्य चार आरोपींना सोबत घेऊन एक वर्षापासून हा कट रचला जात होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

३ फेब्रुवारीला रात्री उनवणे यांचे राहत्या घरापासून पाच जणांनी अपहरण केले. त्यांच्याकडून ४० लाखाची खंडणी उकळल्यानंतर महाड येथे नेऊन प्रवासादरम्यान आरोपींनी मोटारीत उनवणे यांचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर उनवणे यांचा मृतदेह दगडाने ठेचून महाड येथील सावित्री नदीच्या पुलावरून फेकून दिला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाकरिता पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा पथके तयार केली.

तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचेही पथक समांतर तपास करत होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दीपक चंडालिया याला हरियाणा येथून अटक केली. त्यानंतर इतर आरोपींना जेरबंद केले. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. आरोपींकडून ३९ लाख ५ हजार ६७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दृश्यम चित्रपट पाहून रचला कट
उमेश, दीपक, सागर आणि बाबू या आरोपींनी ऑक्टोबर महिन्यात एक अपहरण आणि खंडणीचा गुन्हा केला होता. या गुन्ह्यातून आरोपी बाहेर आल्याने मुख्य आरोपी प्रभू पुजारी याने हेरले आणि त्यांना उनवणे यांच्या अपहरण आणि खुनात सहभागी करून घेतले. ऑक्टोबर महिन्यातील गुन्ह्यात वापरलेली मोटारच त्यांनी उनवणे प्रकरणात वापरली. आरोपींनी हा खून आणि अपहरणाचा कट दृश्यम चित्रपट पाहून केल्याचे समोर आले आहे. त्या चित्रपटाप्रमाणे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी उनवणे यांचा मोबाईल देहूरोड येथे कर्नाटककडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये फेकून दिला. त्यामुळे पोलिस तपासासाठी सोलापूरपर्यंत गेले होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri murder businessman employee crime