esakal | फॉर्म नंबर १७ भरण्यासाठी मुलांची अडवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

exam

Pimpri : फॉर्म नंबर १७ भरण्यासाठी मुलांची अडवणूक

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सध्या दहावी आणि बारावीच्या पुर्नपरीक्षार्थ्यांची फॉर्म नंबर १७ भरण्याची लगबग सुरू आहे. पण शहरातील अनेक महाविद्यालयांकडून ‘नको ती कटकट’ असे म्हणत फॉर्म भरून घेण्यासाठी मुलांची अडवणूक केली जात आहे. काही छोट्या उच्च माध्यमिक विद्यालयाकडून मोठ्या कनिष्ठ विद्यालयाकडे पाठविण्यात येत असल्याने विद्यार्थी त्रासले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसाठी खासगी पद्धतीने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘फॉर्म नंबर १७’ भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी शहरात ९१ संपर्क केंद्रांची सोय केली आहे. विद्यार्थ्यांना येत्या १६ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवात केली आहे, अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत १८ ऑक्टोबरपर्यंत आहे. पण विद्यार्थी मूळ अर्ज कागदपत्रांसह संपर्क केंद्र शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयात जात आहे. ‘नको ती कटकट’ या भावनेतून काही शाळांकडून मुलांना टाळण्यात येत आहेत.

तसेच त्यांना दुसऱ्या महाविद्यालयाचा पर्याय सुचवीत आहेत. त्याठिकाणी मुले गेल्यावरही त्यांच्याकडून बोर्डाच्या शुल्कापेक्षा जादा शुल्काची आकारणी करण्यात येत असल्याची तक्रार वैभव कांबळे या मुलाने ‘सकाळ’कडे केली. प्रत्यक्षात दहावीसाठी नोंदणी शुल्क १ हजार आणि प्रक्रिया शुल्क १०० रुपये आहे आणि बारावीसाठी शुल्क ५०० रुपये आणि १०० रुपये प्रक्रिया शुल्क भरणे आवश्यक आहे. पण काही संपर्क केंद्रातून मुलांकडे जादा शुल्‍काची मागणी केली जात आहे.

अशी होती घटना

रूपीनगरमधील एका अनुदानित शाळेतील विद्यार्थी १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी गेला. तेथील लिपीकाने फॉर्म भरून न घेता त्याला दुसरा पर्याय सुचविला. त्यासंबंधित आकुर्डीतील महाविद्यालयात गेल्यावर त्याठिकाणी त्या विद्यार्थ्यांकडे २ हजार रुपयांची मागणी केली. अशा पद्धतीने मुलांची पिळवणूक सुरू आहे.

‘‘ज्या संपर्क केंद्र शाळांकडून मुलांची अडवणूक केली जात असेल, अशा मुलांनी एसएससी बोर्डाकडे तक्रार केली पाहिजे. संबंधित शाळेची गंभीर दखल घेतली जाईल.’’

-अनुराधा ओक, विभागीय सचिव, एसएससी बोर्ड पुणे विभाग

‘‘ज्या संपर्क केंद्राला जबाबदारी दिली आहे. त्यांनी नियमाने काम केले पाहिजे. उगाच मुलांची अडवणूक करू नये. याबाबत मुख्याध्यापकांना सूचना करण्यात येईल.’’

- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता मुख्याध्यापक संघ महामंडळ

शहरातील स्थिती आकडे बोलतात

  1. इयत्ता - संपर्क केंद्र - नोंदणी शुल्क

  2. दहावी - ७ - ११००

  3. बारावी - ८४ ६००

loading image
go to top