esakal | पिंपरी : तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने पालकवर्गात अजूनही धास्ती
sakal

बोलून बातमी शोधा

schooling

तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने पालकवर्गात अजूनही धास्ती

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : लॉकडॉउनमुळे कुटुंबातले बहुतांश सदस्य घरी आहेत. अशा परिस्थितीत ‘वर्क फ्रॉम होम’ आणि विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शाळांचे गणित जुळवणे म्हणजे पालकांची तारेवरची कसरत होत आहे. गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थी स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा आयपॅडसमोर बसूनच शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्यांना मोबाईल आणि लॅपटॉपची सवय लागली, अभ्यासापासून विद्यार्थी दुरावले आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू होत काही पालकांत अधिक उत्साह दिसून आला. मात्र तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने पालकवर्गात अजूनही धास्ती आहे. या पार्श्‍वभूमीवर पालक व शिक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

सोमवारपासून कोरोना संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा आता कडक नियमांबरोबर आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होत आहेत. स्थानिक प्रशासनाने शाळांना कोविड नियमांचे पालन करण्याची सक्त ताकीद दिली आहे. शाळेत मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे बंधन घातले आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रिनटाईम वाढला आहे. संवादाचा अभाव, डोळ्यांवरील वाढता ताण, मुलं आणि शिक्षकांमध्ये विसंवाद, तसंच ऑनलाइन शिक्षणातली तांत्रिक आव्हाने अशा अनेक तक्रारींबाबत शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचार आणि वैद्यकीयतज्ज्ञ काळजी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: खळबळजनक! 'शिवसेना नेत्यानेच परबांविरोधातील माहिती सोमय्यांना पुरविली?'

भोसरीच्या वंदना खोब्रागडे यांचा मुलगा आतिश आठवीच्या वर्गात शिकतो. ते सांगतात, ‘‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असताना मुलांच्या ऑनलाइन शाळेकडेही लक्ष देणे आव्हानात्मक आहे. मी तर त्याला शाळेत पाठविणार आहे. शाळा नक्की काळजी घेईल.’’

बोपखेलमधील काळूराम गोडांबे म्‍हणाले, शाळा सुरू होत आहेत. या निर्णयाचे मी स्वागतच करत आहे. माझी मुलगी हिंदवी इयत्ता दहावीच शिकते. मुले घरी बसून कंटाळले आहेत. ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन शिक्षण कधीही उत्तमच आहे. ’’

वर्षा वानखेडे म्हणाल्या,‘‘शाळा सुरू होणे आवश्‍यक आहेत. दीड वर्षापासून मुले मोबाइलमध्ये गुंतले आहेत. माझा आठवीला आहे. मी त्याला शाळेत पाठविणार आहे. कारण मुलांना शाळेत जाण्याची गरजच आहे. ’’

नारायण चंदेल सांगतात, ‘‘मुलांच्या सुरक्षततेसाठी शाळांनी काय तयारी केली आहे, याचीदेखील पाहणी करणार आहे. त्यानंतरच माझ्या मुलाला दोन दिवस शाळेत पाठवून पाहणार आहे. कारण माझा दहावीला आहे, मी रिस्क घेणार नाही.’’

चिंचवडमधील प्रीतम बंब म्हणाले, ‘‘ मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकसंघाची बैठक घेणार आहे. राज्य सरकारने मात्र दिवाळीनंतर शाळा सुरू करणे आवश्‍यक होते. कारण अजून कोरोना नष्ठ झालेला नाही. शाळांनी मुलांना वाफ देण्याची सुविधा द्यावी.’’

नवी सांगवीतील सुनिल पाटील, ‘‘मी माझ्या मुलांना शाळेत पाठविणार नाही. आम्हाला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही. मी अद्याप संमतीपत्र दिले नाही. ’’

‘‘शाळेत मुलांना पाठविण्यास अनेक पालक उत्साही आहेत. सरकारच्या सुचनांनुसार बहुतांश शाळामधील शिक्षक कर्मचाऱ्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. मुलांची निश्‍चित काळजी घेतली जाणार आहे. ’’

-आदिनाथ कराड, सहाय्यक शिक्षक माध्यमिक विद्यालय फुगेवाडी भागशालाबोपखेल

‘‘शाळा सुरू करण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे. पालकांची बैठक घेतली आहे. शासनाच्या आदेशानुसार तीन तासांची शाळा भरविता येईल. थर्मामीटर व ऑक्सिमीटरद्वारे दररोज विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.’’

-निलेश गायकवाड, मुख्याध्यापक, जिजामाता विद्यालय, भोसरी

या नियमांचे पालन करणे आवश्यक

कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनाने जारी केलेल्या कार्यपद्धतीचे काटेकोरपणाने पालन करावे. एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २०विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, लगेच कोरोना चाचणी करुन घेणे या नियमांचं पालन करण्यात यावे, असे शासनाने शासन निर्णयात सांगण्यात आले आहे.

loading image
go to top