
काळेवाडी येथील कार्यालयातून अपहरण झालेल्या वकिलाचा अनैतिक संबंधाच्या संशयातून खून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
Murder Case : पिंपरी : अपहृत वकिलाचा अनैतिक संबंधाच्या संशयातून खून झाल्याचे उघड
पिंपरी - काळेवाडी येथील कार्यालयातून अपहरण झालेल्या वकिलाचा अनैतिक संबंधाच्या संशयातून खून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
राजेश्वर गणपतराव जाधव (वय ४२, रा. आझाद कॉलनी, काळेवाडी), बालाजी मारुती आयनलवार (वय २४), सतीश माणिकराव इंगळे (वय २७, दोघेही रा. भत्तापूर, पो. होट्टल, ता. देगलूर, जि. नांदेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शिवशंकर दत्तात्रय शिंदे (वय ४५, रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी) असे अपहरण करून खून झालेल्या वकिलाचे नाव आहे. शिंदे यांचे काळेवाडीतील विजयनगर येथे कार्यालय असून ३१ डिसेंबरला (शनिवार) दुपारी ते बेपत्ता झाले. शोध घेऊनही ते सापडत नसल्याने त्यांच्या मेहुण्याने रविवारी पहाटे वाकड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या तक्रारीनुसार राजेश्वर जाधव याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.
त्यानुसार पोलिसांनी आरोपीचे मोबाईल लोकेशन व घटनास्थळी आढळलेल्या एका वाहनावरून आरोपींचा माग काढायला सुरुवात केली. अशातच महाराष्ट्र-तेलंगणा सिमेजवळून एक अर्धवट जळालेला मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस त्या दिशेने रवाना झाले. नांदेड परिसरातून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या एका नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून शिंदे यांचा खून केल्याचे समोर आले. त्यांचा मृतदेह तेलंगणा राज्यातील मदनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका रस्त्यालगत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.