पिंपरी: ‘आधार’शिवाय संचमान्यता निराधार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी: ‘आधार’शिवाय संचमान्यता निराधार!

पिंपरी: ‘आधार’शिवाय संचमान्यता निराधार!

पिंपरी: पहिली ते बारावीच्या विद्यार्थी संख्येनुसार शाळांची संचमान्यता होत आहे. त्यामुळे आता शाळांनी विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अद्ययावत केल्याशिवाय शिक्षकांची पदे निश्चित होणार नाहीत. जितक्या विद्यार्थ्यांच्या ‘आधार’ची नोंदणी केली आहे, तितकाच विद्यार्थी संख्या पट गृहित धरला जाणार आहे. परिणामी, संचमान्यतेस अडथळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे ही नोंदणी शाळांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

संचमान्यतेसाठी विद्यार्थी संख्या सर्वाधिक महत्त्वाची असते. त्यासाठी सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करण्याबाबत बऱ्याचदा आदेश बजावले. मात्र, अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण झालेले नाही. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या बोटांच्या ठशासह नोंदणी करणे काही शाळांना, पालकांना शक्य झाले नाही.

या पार्श्‍वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप यांनी विद्यार्थी नोंदणीसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहेत. यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी त्यांच्या आधारक्रमांकाची माहितीही याअंतर्गत पुरवणे गरजेचे असते. प्राथमिक ते माध्यमिक शाळांच्या संचमान्यता एनआयसीमार्फत तयार करून जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येतात.

३० सप्टेंबर २०२१पर्यंत नोंद आवश्‍यक

अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत दरवर्षी होणाऱ्या वाढीमुळे त्यांचे समायोजन पूर्णतः होत नसल्यामुळे तसेच, संस्था पालकांना विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करण्यासाठी एक संधी देण्याच्या उद्देशाने २०१९-२० ची संचमान्यता स्थगित केली होती. ही स्थगिती या वर्षीच्या जानेवारीत उठवण्यात आली आहे. आता ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत नोंद केलेली विद्यार्थी संख्या विचारात घेण्यास विभागाने मान्यता दिली आहे.

या नोंदणीबरोबरच विद्यार्थ्यांची आधारकार्ड नोंदणीही गरजेची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा आधारक्रमांक अद्ययावत करणे गरजेचे आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये शाळांच्या संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची आधार विषयातील माहिती ‘स्टुडंट पोर्टल’वर अपडेट करायची आहे. १०० टक्के विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी ही माहिती अद्ययावत करणे गरजेचे असणार आहे.

पटसंख्येवरच संचमान्यता

सर्व माध्यमांच्या, व्यवस्थापनांच्या आधिपत्याखालील शाळांतील विद्यार्थ्यांच्या आधारक्रमांक नोंदणीचे कामकाज तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. सध्या शाळा बंद असल्या, तरी आधार नोंदणी होऊनही क्रमांक न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक प्राप्त करून सरल प्रणालीमध्ये अद्ययावत करावा लागणार आहे.

विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकांची पदे निश्चित करण्याची संचमान्यता केली जाते. मात्र, आता आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरच संचमान्यता केली जाणार आहे. त्यामुळे आधार नोंदणीचे कामकाज अपूर्ण राहिल्यास कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी होणार, असे परिपत्रकात म्हटले आहे.

‘‘विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण झाल्याशिवाय शिक्षकांची पदे निश्चित करण्यासाठीची संचमान्यता करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्भवणाऱ्या परिस्थितीत आधारक्रमांक नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण न करणाऱ्या शालेय व्यवस्थापनास जबाबदार धरले जाणार आहे. अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करून अहवाल सादर करणे आवश्‍यक आहे.’’ - दत्तात्रेय जगताप, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग

टॅग्स :pune