esakal | दीड वर्षानंतर वाजली शाळेची घंटा
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

Pimpri : दीड वर्षानंतर वाजली शाळेची घंटा

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : तब्बल दीड वर्षापासून घरात असलेले विद्यार्थ्यांची आजपासून शाळा भरली आणि शाळांची पहिली घंटा वाजली. सकाळपासून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेकडे धाव घेतली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर रिकाम्या वर्गखोल्या विद्यार्थ्यांनी भरल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मित्र मैत्रिणीची भेट झाल्याचा आनंद दिसत होता. खूप दिवसांनी भेट झाल्यावर गप्पा रंगल्या.

शाळेच्या आवारात मित्रमैत्रिणी सेल्फी काढताना दिसल्या. विद्यार्थ्यांचे औक्षण, ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि मुलांचे थर्मल स्क्रिनिंग करूनच स्वागत करण्यात आले. मुलांत आनंदाचे वातावरण असले तरी संख्या मात्र कमीच होती. एकूणच तीन तासांच्या शाळेत विद्यार्थानी मोकळ्या क्षणाचा आनंद लुटला.

महापालिका शाळेत ढोल ताशांच्या गजर

शहरातील माध्यमिक विभागाच्या शाळा दुपारच्या सत्रात भरल्या. महापालिकेच्या काही शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करीत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. थेरगाव माध्यमिक विद्यालयात सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके व स्थानिक नगरसेवकांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायजर, मास्कचे वाटप केल्याची माहिती मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम यांनी दिली. विद्यार्थ्यांनी देखील मुख्याध्यापकांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मुलांना वर्गात बसवले. एकेका वर्गात १० ते १५ मुलेच होती. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी एकत्र जेवण करू शकणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याची माहिती विषय तज्ज्ञ प्रदीप शिंदे यांनी सांगितेल.

नवमहाराष्ट्र विद्यालयात ‘वेलकम बॅक’

नवमहाराष्ट्र विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व चॉकलेट देण्यात आले. मास्क व योग्य अंतर ठेवून वर्गामध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील, उपमुख्याध्यापक पी.एम. शेख, पर्यवेक्षक शरद परदेशी, पर्यवेक्षिका शुंभागी गमे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये नियमाचे पालन करण्याचे व नियमित येण्याचे आवाहन केले. नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख नीता शेटे यांनी केले.

श्री फत्तेचंद जैन विद्यालय

सर्व शिक्षकांच्या उपस्थित प्रशालेच्या प्राचार्य सुनीता नवले, उपमुख्याध्यापिका मनीषा जैन, पर्यवेक्षक श्रीमान सुभाष देवकाते, पाचवी ते सातवीचे विभाग प्रमुख श्रीमान संतोष शिरसाट यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे औक्षण करून ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी अकरा वेळा नवकार महामंत्र जाप व ओम नमः शिवाय जाप घेण्यात आला.

स्कुलबस जाग्यावरच

एक दिवस आड करून विद्यार्थी शाळेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शहरात चालक अजूनही बस चालवण्यास तयार नाहीत. शहरात ३ हजार स्कुलबस चालक आहेत. टेम्पो, व्हॅन, ट्रॅव्हलबसचा समावेश आहे. सध्या डिझेलचे दर वाढले आहेत. ५० हजार दुरुस्ती खर्च आहे. अद्याप पालकांचे फोन आले नाहीत. एका बसमध्ये ४ ते ६ मुले हवी आहेत. तरच स्कुलबस सुरू करण्‍यास परवडणार असल्याचे पिंपरी चिंचवड शालेय वाहतूक संघाचे शहराध्यक्ष सुनील लांडगे यांनी सांगितले. बस सुरू चालविण्याचा निर्णय बस संघटनेने घेतला आहे. एक दिवस आड करून विद्यार्थी शाळेत उपस्थित राहणार आहेत.

‘‘मराठवाडा मित्र मंडळाचे एम.एम. विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून शाळेत स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तक, लेखन पॅड अशा शालोपयोगी वस्तु देण्यात आल्या. पालकांच्या संमतीपत्राची तपासणी करण्यात आली. ’’

-विद्याराणी वाल्हेकर, मुख्याध्यापक एम.एम. विद्यामंदिर, काळेवाडी

‘‘आठवी ते बारावीपर्यंतचे ३ हजारपेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या आहे. आमच्या शाळेत ३ दिवस मुले आणि ३ दिवस मुलीचे वर्ग भरविण्यात येणार आहे. जी मुले येऊ शकले नाहीत, अशासाठी ऑफलाइन व ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे.’’

-ज्योती मसंद, प्राचार्या, जयहिंद हायस्कूल, पिंपरी

‘पालकांचा व विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. संस्था चालकांनी मुलांसोबत संवाद साधून शुभेच्छा दिल्या.’’

-सुधा भट, अभिषेक विद्यालय शाहूनगर

आकडे बोलतात

(शहरातील आठवी ते बारावीची स्थिती )

  1. शाळा संख्या- २८२

  2. विद्यार्थी संख्या - ४९ हजार ९२४

  3. शिक्षक संख्या - ४ हजार ९००

  4. भोसरीत विद्यार्थ्यांचे स्वागत

दिघी रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय स्थानिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सतिशचंद्र जकाते, मुख्याध्यापक कैलास गिरमकर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. महापालिकेच्या बोऱ्हाडेवाडीतील भाग शाळा आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात विषय तज्ज्ञ विक्रम मोरे, मुख्याध्यापिका जरिना शेख, शिक्षिका हर्षदा राऊत यांच्या हस्ते गुलाब पुष्प व चॅाकलेट देऊन स्वागत केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर वाळके, शिवसेनेचे संतोष तानाजी वाळके, विभाग प्रमुख कृष्ण वाळके, भाऊसाहेब काटे, मनोज परांडे, अविनाश लोणारे, किरण वाळके, तेजस घुले, नवनाथ शेळकंदे आदींनी विद्यार्थ्यांना पाण्याची बाटली, सॅनिटायझर, मास्क, बिस्कीट गुलाब पुष्प दिले. नगरसेविका अनुराधा गोफणे व देविदास गोफणे यांनी भोसरीतील श्रमजीवी शाळा, ज्ञानसगर विद्यामंदिर, श्रीराम विद्यामंदिर, संत ज्ञानेश्वर विद्यालयात पेन वाटप केले.

पिंपळे गुरवमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी

पिंपळे गुरव महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात ऑनलाइन अभ्यासाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी अखेर हजेरी लावली. पहिल्यादिवशी विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी पालक आले होते. विद्यालयातील मुख्याध्यापक जयराम वायाळ, उपमुख्याध्यापक पांडुरंग मृदगुन, नामदेव कोकणे, नलिनी गायकवाड, कविता चव्हाण, अनिल गायकवाड, संतोष चिमटे, विद्या मिसाळ, मनीषा सावर्डेकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या प्रसंगी ओमसाई फौंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत मास्क व सॅनिटाझर वाटप केले.

loading image
go to top