
पिंपरी : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल
पिंपरी : पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १) काही वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगरला जातील. तसेच याच मार्गावरील हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगरला जातील. आळंदी-शेल पिंपळगाव, बहुळ, साबळेवाडी या दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. तसेच आळंदी, मरकळ, लोणीकंदकडे जाणारी वाहतूकही बंद राहणार आहे. (Pune traffic change updates)
यासह नाशिककडून येणारी मोठी वाहने ही शिक्रापूरकडे न जाता तळेगाव-चाकण चौकातून मोशी व तळवडेकडे जाऊ शकतील. देहूरोड येथे जुन्या मुंबई मार्गाने येणारी वाहने सेंट्रल चौकातून निगडीकडे न सोडता ही वाहने सेंट्रल चौकातून मुंबई -बेंगलोर महामार्गाने सरळ वाकड नाका, चांदणी चौकातून पुढे जातील. तसेच मुंबईकडून द्रुतगती मार्गाने पुणेकडे येणारी वाहने उर्से टोल नाका येथून मुंबई-बेंगलोर मार्गाने निगडी मुकाई चौकाकडे न जाता सरळ वाकड नाका व राधा चौक येथून पुण्याकडे जातील.
हेही वाचा: भरदिवसा घरात मुलांना बांधून ठेवले; महिलेवर वार करुन पळवले साडेचार लाख
मुंबईकडून द्रुतगती मार्गाने खिंडीतून तळेगाव कडे येणारी वाहने वडगाव फाट्याकडे न जाता उर्से टोल नाका येथून देहूरोडकडे जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याने जातील. नाशिक व तळेगावकडून येणारी वाहतूक तळेगाव, चाकण चौकातून शिक्रापूरकडे न जाता मोशी, नाशिकफाटा मार्गे पुण्याकडे जातील.
वाहतूक मार्गातील हा बदल शनिवारी मध्यरात्री बारापासून लागू होणार आहे. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.
Web Title: Pimpri Traffic Change In Koregaon Bhima
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..