
Pimpri : सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडी
पिंपळे गुरव : नवी सांगवी येथील कृष्णा चौकात वाहतूक नियंत्रित करण्याच्या उद्देशाने बसवलेली सिग्नल यंत्रणा कोलमडली आहे. चौकांतील सर्वच सिग्नल बंद असल्याने वाहतूक नियमित विस्कळित होते. वाहनांची वर्दळ असलेल्या कृष्णा चौकात लाखो रुपये खर्च करून वाहतूक नियंत्रित करण्यासाठी चौकात सिग्नल यंत्रणा बसविली. ती ही यंत्रणा बंद असल्याने वाहतूक अनियंत्रित झाली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
सांगवी वाहतूक शाखेअंतर्गत असलेल्या पिंपळे गुरव, नवी सांगवी भागात एकही वाहतूक कर्मचारी कुठल्याच चौकात दिसत नाही. त्यामुळे सांगवी वाहतूक शाखा फक्त कागदावरच आहे का? असा संतप्त सवाल ज्येष्ठ नागरिक उपस्थित करत आहेत. कृष्णा चौकात मोठी बाजारपेठ, फ्रुट मार्केट तसेच बसथांबे आहे. येथील रस्ते कायमचे नागरिकांनी गजबजलेले असतात.
तसेच दुसरीकडे रस्त्यावरील वाहनांची संख्याही वाढली आहे. पिंपळे गुरवकडून साई चौकाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांची खूप गर्दी वाढली आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सिग्नलची आवश्यकता आहे. परंतु, सिग्नल बंद असल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची वाट वाहतूक प्रशासन पाहत आहे का?असा प्रश्न नागरिकांमधून होत आहे.
सध्या कृष्णा चौक व काटे पूरम चौक येथे रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे सिग्नल सुरू ठेवल्यास वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तूर्तास येथील सिग्नल बंद ठेवले आहेत. जसे मनुष्यबळ उपलब्ध होईल, तसे त्या चौकात कर्मचारी नेमण्यात येतील.
- सतीश नांदूरकर, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक शाखा
वाहतूक नियमांबाबत वाहतूक शाखेकडे जनजागृती करण्यात येत आहे. तरी ही नागरिक शहाणे झाल्याचे दिसत नाही. भरधाव वाहन चालवणे, चौकातून चुकीच्या पद्धतीने गाडी चालवून वाहतुकीस अडथळा करणे, असे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावायची कुणी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- रवींद्र पारधे,
ज्येष्ठ नागरिक