esakal | Pimpri: कचरा घरातच जिरवा, १४०० रुपये मिळवा; स्थायी समितीचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

ओला कचरा

पिंपरी : कचरा घरातच जिरवा, १४०० रुपये मिळवा; स्थायी समितीचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : घरोघरचा कचरा निर्मूलनासाठी महापालिका इंदूर पॅटर्न राबवणार आहे. त्यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रांतून प्रत्येकी पाचशे कुटुंबांची निवड केली जाणार आहे. यंत्रणा उभारणे व कंपोस्ट बिन्स खरेदी करण्यासाठी एक हजार चारशे रुपये अनुदान प्रत्येकी देणार आहे. त्यासाठी ६५ लाख रुपये खर्च येणार आहे. स्थायी समितीच्या सभेने बुधवारी मंजुरी दिली.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत घरोघरचा कचरा संकलित केला जातो. त्याची विल्हेवाट मोशी कचरा डेपो येथे लावली जाते. मात्र, त्याची क्षमता आता संपत आली असून, भविष्यात कचऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तो टाळण्यासाठी घरातील कचरा घरातच जिरवण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. हा प्रयोग मध्यप्रदेशातील इंदूर शहरात राबविण्यात आला आहे.

हेही वाचा: यवतमाळ : दारव्हा, दिग्रस, पुसद भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

त्याची पाहणी दोन महिन्यांपूर्वी महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केली होती. तेथील होम कंपोस्टिंग यंत्रणा शहरात राबवावी, त्यासाठी इच्छुक नागरिकांना अनुदान द्यावे व त्यासाठीच्या खर्चास मंजुरी मिळावी, असा विषय स्थायी समिती सभेसमोर होता. त्यासाठीच्या खर्चास मंजुरी दिल्याचे समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी सांगितले.

विविध विकास कामांसाठी येणाऱ्या पाच कोटी ३४ लाख रुपये खर्चासही स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. यात थेरगावातील बीफ मार्केटचे पिंपरीत स्थलांतरीत करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, जलनिःसारण नलिका टाकणे, व्यायाम शाळा व्यवस्थापन करारास मुदतवाढ देणे, जलतरण तलावांचे भाडेवाढ करणे, एमआयडीसी पोलिस ठाणे इमारतीचे विस्तारीकरण आदींचा समावेश होता.

अशी असेल योजना

८ एकूण क्षेत्रीय कार्यालये

५०० एका कार्यालय क्षेत्रातील कुटुंबे

४,००० आठ कार्यालय क्षेत्रांतील कुटुंबे

१,४००

एका कुटुंबाला अनुदान

५६,००,०००

अनुदानाची एकूण रक्कम

loading image
go to top