esakal | Pimpri : वायसीएमचे निवासी डॉक्टर्स संपावर, विविध मागण्यांसाठी आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor Agitation

पिंपरी : वायसीएमचे निवासी डॉक्टर्स संपावर, विविध मागण्यांसाठी आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - विविध आश्‍वासनांची पूर्तता न केल्यामुळे ‘मार्ड’ संघटनेलने संप पुकारला आहे. त्याला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूगाणालयाच्या (वायसीएम) निवासी डॉक्टरांनी पाठिंबा देत सहभाग घेतला आहे. हे निवासी डॉक्टर्स आज (ता.२) सकाळी आठ वाजल्यापासून बेमुदत संपावर गेले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका पदव्युत्तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. आकाश गंगणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांची शैक्षणिक शुल्क माफी, प्रोत्साहन भत्ता, पालिका महाविद्यालयाच्या डॉक्टर्सच्या टीडीएसचा मुद्दा आणि राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्टेलमधल्या समस्या सोडवाव्यात या सगळ्या निवासी डॉक्टर्सच्या मागण्या आहेत. दरम्यान कोरोना काळात निवासी डॉक्टर्सनी केलेली रुग्णसेवा आणि यादरम्यान त्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान, हे पाहता या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी शुल्क माफीचे आश्‍वासन दिले होते. आता मात्र आश्‍वासनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ‘मार्ड’ संघटनेने बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाची सुरुवात ओपीडीपासून करण्यात आली आहे. त्यांनी काम बंद केले होते. या आंदोलनामुळे रूग्णसेवेत कुठेही खंड पडणार नाही. याची काळजी घेत काही निवासी डॉक्टरांनी अतिदक्षता विभाग,अत्यावश्यक शस्त्रक्रिया विभाग सुरू ठेवून रुग्णसेवा दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा: Pimpri : शिक्षण विभागाचा नियोजन शून्य कारभार पुन्हा उघड

मागण्या मान्य करा, अन्यथा बेमुदत आंदोलन सुरुच

कोरोना काळातील निवासी डॉक्टरांची रूग्णसेवा व झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी शैक्षणिक शूल्क माफीचे आश्वासन दिले होते. मात्र, फी माफीची आश्वासन पूर्ती न झाल्यामुळे निवासी डॉक्टरांनी आजपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्सने घेतला आहे.

‘गरज सरो अन वैद्य मरो’ हे सरकारचे धोरण

या आंदोलनात महापालिका पदव्युत्तर संस्थेतील सर्व एमडी, एमएस, डिप्लोमा, सीपीएस, डीएम, एमसीएच डॉक्टर्सनी आपला सहभाग नोंदवला आहे. कोरोना संपताच ‘गरज सरो अन वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे सरकार डॉक्टरांना विसरले असल्याची टीका पिंपरी चिंचवड महापालिका पदव्युत्तर संस्थेचे सल्लागार डॉ. अजित माने यांनी केली.

निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय?

- कोव्हिड भत्ता मिळाला पाहिजे

- शैक्षणिक शुल्क माफ झाले पाहिजे

- राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेलच्या समस्या दूर व्हाव्या

- पालिका महाविद्यालयातील डॉक्टरांचा टीडीएस, प्रोत्साहन भत्ता, वैद्यकीय पदवुत्तर अभ्यासक्रमाची फी माफ करावी

loading image
go to top