पिंपरीतील व्यावसायिकाचा 40 लाखांसाठी खून; चार जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

  • ठिकठिकाणी फिरवून पैसे मिळताच केला खून 

पिंपरी : पिंपरी येथील चिटफंड व्यावसायिकाचे 40 लाखांसाठी तीन ते चार जणांनी अपहरण केले. अपहरण केल्यानंतर व्यावसायिकाला ठिकठिकाणी फिरविले. मात्र, पैसे मिळताच त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आनंद साहेबराव उनवणे (वय 42, रा. न्यू म्हाडा कॉलनी, मोरवाडी, पिंपरी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. उनवणे यांचा चिटफंडचा व्यवसाय होता. 3 फेब्रुवारीला रात्री सव्वादहा वाजता उनवणे हे राहत्या घरातून बेपत्ता झाल्याबाबत त्यांच्या नातेवाइकांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर रायगडमधील महाड येथे शनिवारी (ता. 6) त्यांचा मृतदेह आढळला. दरम्यान, आरोपींनी उनवणे यांचे अपहरण करताच त्यांचा मोबाईल बंद करण्यात आला. त्यांना मोटारीतून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवण्यात आले. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी उनवणे यांना धमकावत 40 लाख रुपये घेऊन येण्यास सांगण्यास अपहरणकर्त्यांनी भाग पाडले. त्यानुसार उनवणे यांनी ती रक्कम राहत्या घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्वतःच्या मोटारीत ठेवण्यास सांगितली. रक्कम ठेवल्यानंतर काही वेळाने आरोपी मोटारीतील रक्कम घेऊन निघून गेले. रक्कम मिळताच आरोपींनी त्यांचा खून केल्याचे पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी सांगितले. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत. गुन्हे शाखा युनिट दोनचेही पथक समांतर तपास करत आहे. या प्रकरणातील काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून, पोलिस आरोपींच्या मागावर आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri's businessman murdered for money