कोरोनाशी लढा देणाऱ्या पिंपरीतील 'वायसीएम'ला आता बाऊन्सरचा वेढा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

गेल्या तीन महिन्यांपासून कोविडशी लढा देणाऱ्या वायसीएम रुग्णालयाला आता बाऊन्सरचा वेढा असणार आहे.

पिंपरी : गेल्या तीन महिन्यांपासून कोविडशी लढा देणाऱ्या वायसीएम रुग्णालयाला आता बाऊन्सरचा वेढा असणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्‍टर यांचे वाद होऊ लागले आहेत. गेल्याच आठवड्यात एका भाजप नगरसेवकाने गोंधळ घातल्याचा आरोपही झाला होता. या पार्श्‍वभूमीवर बारा बाऊन्सर नियुक्त करण्यात येणार आहे. या बाबतचा प्रस्ताव उद्याच्या महापालिका स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे रुग्णसंख्याही अधिक वेगाने वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे हे रुग्णालय केवळ कोरोनाबाधित रुग्णांसाठी अद्यावत ठेवले आहे. यामध्ये दररोज नागरिकांची तपासणी, संशयितांचे स्वॅब आणि बाधितांना दाखल करून घेऊन उपचार केले जातात. रुग्णसंख्या वाढल्यामुळे येथील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. गंभीर रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. यातूनच रुग्णांच्या नातेवाइकांचा वाद होतो. तसेच, लोकप्रतिनिधींचा 'वशिला' लावला जातो. गेल्याच आठवड्यात भाजपच्या एका नगरसेवकाने रुग्णालयात येऊन धिंगाणा घातला, असा आरोप करत डॉक्‍टरांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिका प्रशासन, भाजप पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्हाला संरक्षण द्या, अशी मागणी डॉक्‍टरांनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर हा प्रस्ताव आला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तातडीची बाब म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तात्पुरत्या स्वरुपात बाऊन्सर घेण्याचे आदेश दिले. तसेच, तातडीची गरज असल्याने निविदा प्रक्रिया न राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला. यानंतर प्रोटेक्‍शन पॉवर बाऊन्सर या संस्थेने कोटेशन सादर केले. यानंतर 24 तासात आठ-आठ तासांच्या तीन पाळीत एक महिला व तीन पुरुष असे बारा बाऊन्सर घेण्याचे ठरले. कोटेशननुसार एका बाऊन्सरला दरमहा 25 हजार मानधन देण्यात येणार आहे. दोन महिन्यांसाठी सहा लाख रुपये खर्ची पडणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाऊन्सर किती कामाचे ठरणार? 

कोरोना समर्पित या रुग्णालयासाठीची सध्याची सुरक्षा व्यवस्था अतिशय कुचकामी आहे. नगरसेवक, पदाधिकारी आणि राजकीय व्यक्ती यांचा त्यांच्यावर दबाव असतो. त्यामुळे या व्यक्ती थेट रुग्णालयात घुसतात. तसेच, डॉक्‍टरांना शिवीगाळ, रुग्णालय प्रमुखांना धमक्‍या देणे, असे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत. त्यामुळे या बाऊन्सरचा किती उपयोग होतो, याविषयी साशंकता आहे. यासाठी राजकारण्यांनी पुढारपणा टाळून समजुतीने रुग्णालयात जाणेच टाळणे आवश्‍यक आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेवकामुळे कोविडच्या काळात महापालिकेवर काही लाखांचा भुर्दंड बसल्याचा 'भाजप'मधील एका गटाने केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri's ycm hospital safety on bouncers hand