पिंपरी-चिंचवडमधील गुरुजनांना दंश करणाऱ्या 'नागोबां'ना हटवा 

पिंपरी-चिंचवडमधील गुरुजनांना दंश करणाऱ्या 'नागोबां'ना हटवा 

शहरातील कामगार, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेने प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू केल्या. 38 वर्षांच्या वाटचालीत याच शाळांमध्ये दहावीपर्यंत शिकून अनेक पिढ्या घडल्या. कोणी डॉक्‍टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक झाले. कोणी कंपन्यांचे मालक, संचालक, महापालिका अधिकारी, लोकनियुक्त कारभारी झाले. पण, याच शाळांमधील शिक्षणाचा दर्जा, काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत आक्षेप घेतले जात आहेत. वर्तनुकीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. वीस-वीस वर्ष शिक्षक वा कर्मचारी एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचा व बदल्यांसाठी आर्थिक व्यवहार करीत असल्याचा आरोप आहे. हा प्रकार सर्रासपणे सुरू असेल आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना त्रास होत असेल, तर इतके वर्ष महापालिकेच्या कारभाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष का केले? असा प्रश्‍न उपस्थित होतो. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नासके कांदे वेळीच काढा 
उत्तमोत्तम शिक्षणाची गंगा स्वार्थीपणाच्या नेतृत्वामुळे कधी मैली झाली, हे कळलेच नाही की, जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले गेले? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तब्बल वीस वर्ष एखादी शिक्षक, शिपाई एकाच ठिकाणी कार्यरत कसा राहू शकतो? इतकेच नव्हे तर, शिपाई पदावरील व्यक्ती शिक्षकांच्या बदलीसाठी पाच-पाच लाखांची मांडवली करीत असेल किंवा शिक्षक म्हणून मिरवताना जमीन खरेदी विक्रीसाठी एजंटगिरी करीत असेल किंवा लोकप्रतिनिधींना एखादा अधिकारी जुमानत नसेल, विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून बदनाम झालेल्या ठेकेदाराला काम मिळत असेल, आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचा भंग होत असेल किंवा एखादी शिक्षिका विद्यार्थ्यांवर वर्ग सोपवून घरची कामे करून येत असेल, तर यासारखी अन्य शोकांतिका नाही आणि हे सारं महापालिकेचे कर्तेधर्ते पदाधिकारी, लोकप्रतिनिधी जाहीरपणे सर्वसाधारण सभेत सांगत असतील तर, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. यामुळे शिक्षण विभागावर नियंत्रण ठेवणारे तत्कालीन शिक्षण मंडळ असेल किंवा आताची शिक्षण समिती, परिस्थिती 'जैसे-थे' आहे, असेच म्हणावे लागेल. शिपाई, शिक्षक, कर्मचारी वा अधिकारी असे का वागतात? त्यांना कोणाचा धाक नाही का? याचा विचारही कारभाऱ्यांनी करायला हवा. स्वार्थासाठी राजकीय हस्तक्षेप होत असेल, तर त्वरित रोखायला हवा. कारण, विद्यादानासारख्या पवित्र आळीत, नासके कांदे सर्व आळी नासवू शकतात. त्यासाठी असे कांदे शोधून वेळीच त्यांना बाहेर काढून कचऱ्यात टाकणे किंवा त्यांच्यावर शिस्त व दंडात्मक प्रक्रिया करून त्यांचा वापर करणे आवश्‍यक आहे. 

सर्वच सारखे नसतात 
आपल्याकडे मंदिर किंवा धार्मिक स्थळांना फार महत्त्व आहे. धार्मिक स्थळ कोणत्याही जाती-धर्माचे असो. प्रत्येकाची श्रद्धा, भाव जडलेला असतो. त्याविषयी कोणीही अपशब्द सहन करू शकत नाही. मग, सर्वांसाठी ज्ञानाचे मंदिर व जीवनाची दिशा देणारे पवित्र माध्यम असलेल्या शाळांची विटंबना आणि तेथील गैरप्रकार कसे सहन केले जाऊ शकतात? हे दुर्दैव आहे. पालकांनी जागृत आणि लोकप्रतिनिधींनी सतर्क राहायला पाहिजे. सर्वच सारखे नसतात. प्रामाणिकपणे काम करणारेही अनेक आहेत. त्यांच्यामुळेच आजही शाळा टिकून आहेत. अशांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहायला हवे. हे काम शहराचे कारभारीच करू शकतात. कारण, अधिकारी आज येणार, उद्या जाणार. शिक्षक किंवा कर्मचारी व पदाधिकारी इथेच कायम राहणारे आहेत. त्यामुळे चुकणाऱ्यांना शिक्षा हवीच. नुसता तोंडदेखलेपणा किंवा ठेकेदाराचा कणा होऊन उपयोग नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. तिजोरीवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या व प्रामाणिकपणे विद्यादान करणाऱ्या गुरुजनांना छळवणूक आणि पिळवणुकीचा दंश करणाऱ्या नागोबांना हटवा आणि ज्ञानमंदिरातील दिवा तेवता ठेवा, हीच अपेक्षा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com