भोसरी एमआयडीसीतील रस्ते खड्ड्यांमुळे धोकादायक; वाहन चालविताना करावी लागतेय कसरत 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

भोसरी एमआयडीसीत दुचाकीवरून कामाला जातो. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांतून दुचाकी चालविताना कसरत करावी लागते.

भोसरी : भोसरी एमआयडीसीत दुचाकीवरून कामाला जातो. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांतून दुचाकी चालविताना कसरत करावी लागते. दररोजच्या या प्रवासामुळे पाठदुखीचा त्रास वाढला आहे, अशी कैफियत कामगार अंकुश वनजे यांनी मांडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने भोसरी एमआयडीसीतील टेल्को रस्ता ते इंद्रायणी चौक, इंद्रायणी चौक ते शांतिनगर, टेल्को रस्ता ते शांतिनगर आदींसह इतरही मुख्य रस्ते विकसित केले आहेत. एमआयडीसीतील हे रस्ते प्रशस्त आहेत. मात्र, अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण आणि डागडुजी होत नाही. एमआयडीसीतील डब्ल्यू-142 ब्लॉकलगत साईराज इंजिनिअरिंगजवळील रस्ता, जे-54 ब्लॉकमधील अस्मिता इंजिनिअरिंग, डब्ल्यू-81 एस ब्लॉकमधील गॅलॅक्‍सी इंडस्ट्रिअल इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड, डब्ल्यू-96 ब्लॉकमधील शिवकिरण इंडस्ट्रीज, एस-153 ब्लॉकमधील भक्ती कंपनी, एस-151 फेब्रिटेक इंजिनिअरिंग, एस-18 ब्लॉकमधील पुणे टेक्‍ट्रोल प्रायव्हेट लिमिटेड, गुळवेवस्ती सर्व्हे क्रमांक 55 हनुमाननगर, शांतिनगर गल्ली क्रमांक तीन समोर आदी भागांसह अंतर्गत भागातील इतर रस्त्यांना खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी कामगार व लघुउद्योजकांमधून होत आहे. टेंपोचालक फैयाज शेख म्हणाले, "एमआयडीसीतून मटेरिअल घेऊन जाताना खड्ड्यांमुळे टेंपो आदळतो. त्यामुळे मालाचे नुकसान होते. शिवाय गाडीचे मेंटेनन्स वाढले आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरी एमआयडीसीतून महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र, पालिकेद्वारे लघुउद्योजकांना नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. इंद्रायणीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज कमान ते हनुमान चौक या रस्त्यावरील स्टॉर्म वाटरलाइन दुरुस्तीचे काम दोन वर्षांपूर्वी होऊनही डांबरीकरण किंवा डागडुजी केली नाही. केवळ निवडणूक जवळ आल्यावरच डांबरीकरणाचे काम हाती घेतले जाते. 
- तुषार सहाणे, लघुउद्योजक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pits on internal roads in Bhosari MIDC