मोजक्‍या एसटी बसमुळे प्रवाशांचे हाल; तासन्‌तास करावी लागतेय प्रतीक्षा

आशा साळवी
Tuesday, 8 September 2020

प्रवाशांना बससाठी तासन्‌तास पहावी लागते वाट; वेळापत्रकानुसार गाड्या सोडण्याची मागणी 

पिंपरी : लॉकडाउनमध्ये पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर एसटी महामंडळाची बससेवा सुरू झाली. मात्र, बसचे वेळापत्रकच नसल्याने आणि मोजक्‍या बस सोडण्यात येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एरवी वल्लभनगर आगार प्रवाशांनी गजबजलेले असते. मात्र, कोरोनामुळे बससेवा बंद होती. तब्बल पाच महिन्यानंतर एसटी धावू लागली. परंतु, मोजक्‍याच बस सुरू केल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. सध्या दररोज आठ ते 10 बस धावत आहेत. आगारात दररोज तीन ते चार प्रवासी दिसतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांना बससाठी तासन्‌तास ताटकळत बसावे लागत आहे. ठरावीक मार्गावर आसन क्षमतेच्या निम्मे (21) प्रवासी आले, तरच एक बस सोडण्यात येते. प्रत्येक मार्गावर तितके प्रवासी मिळण्यास बराच वेळ लागतो. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब

दुसरीकडे काही गाड्यांमध्ये जागा पकडण्यासाठी प्रवाशांना धावपळही करावी लागते. या आगारात बस नसल्यास काही प्रवासी चिंचवड किंवा वाकड येथे जात असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बसचे वेळापत्रक नाही, तसेच मोजक्‍याच बस सोडण्यात येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांना नाइलाजास्तव खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. नियमित वेळापत्रकानुसार दररोज बस सोडाव्या, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. 

तीन लाख 75 हजारांचे उत्पन्न 
बसस्थानकातून जुन्नर, सोलापूर, पंढरपूर, चिपळूण, नाशिक, महाड एकूण 10 बस सोडल्या आहेत. तसेच, विविध ठिकाणाहून मुक्कामी सुमारे 70 बस असतात. प्रवासी संख्येनुसार बस सोडण्यात येत आहेत. 1 ते 5 सप्टेंबरपर्यंत साडेअठरा हजार किलोमीटर झालेल्या प्रवासातून या आगाराला तीन लाख 75 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. 

कमी बसगाड्यांमुळे प्रवासाची अडचण होत आहे. गाडीची वाट पाहण्यातच वेळ जातो. बसच्या चौकशी गेलेल्या नागरिकांना पुण्यात जा किंवा गाडी अजून सुरू नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ऐनवेळी मोठी धावपळ होत आहे. 
- कॉलन सोरेस, प्रवासी 

कोरोनामुळे अजूनही प्रवासी बाहेर पडत नाहीत, तरीही दररोजचा 70 ते 80 हजारांचा महसूल जमा होत आहे. 
- तुषार सातपुते, वाहतूक नियंत्रक, वल्लभनगर एसटी आगार 

काय आहे स्थिती? 

  • पाच दिवसांत तीन लाख 75 हजार उत्पन्न 
  • गाड्यांचा साडेअठरा हजार किलोमीटर प्रवास 
  • दिवसाला आठ ते 10 बस धावतात 
  • 21 प्रवासी मिळण्यास अडीच ते चार तासांचा कालावधी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plight of passengers without ST bus at pimpri chinchwad