Big Breaking : पीएमपी बससेवा सुरू करण्याबाबत झाला मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 26 मेपासून पीएमपीची बस वाहतूक सुरू होणार आहे. त्यासाठीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (ता. 21) झाली.

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 26 मेपासून पीएमपीची बस वाहतूक सुरू होणार आहे. त्यासाठीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (ता. 21) झाली. येत्या दोन दिवसांत या वाहतुकीचे वेळापत्रक तयार करण्याचा निर्णय त्यात झाला.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड महापालिकेला रेड झोनमधून राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी वगळले आहे. त्यामुळे या शहरावरील अनेक निर्बंध आता कमी झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बैठक आयोजित केली होती. त्यात पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे आदी सहभागी झाले होते. त्यात पिंपरी-चिंचडमध्ये किमान 15 मार्गांवर बस सेवा प्रवाशांसाठी सुरू करता येईल का, या मुद्द्यांवर चर्चा झाली. ही बससेवा सुरू करण्याची तयारी पीएमपीने दर्शविली. त्यानुसार मार्ग निश्चित करण्याचे काम आता सुरू झाले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहराचा समावेश कोरोनाच्या रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये बससेवा सुरू होऊ शकणार नाही. तसेच, पिंपरी चिंचवडमधूनही पुण्यात बससेवा सुरू करणे शक्य नाही, असे यावेळी पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पीएमपीच्या मोठ्या बसमध्ये 21 तर, मिडी बसमध्ये 14 प्रवासी प्रवास करतील. तसेच प्रवाशांसाठी बसण्याचीही विशिष्ट व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही बससेवा सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 100 बस वापरण्यात येतील. प्रवाशांच्या गरजेनुसार ही संख्या कमी-जास्त होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या बाबत पीएमपीच्या अध्यक्षा गुंडे म्हणाल्या, "आयुक्त हर्डीकर यांच्याशी चर्चा झाल्यानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये 26 मेपासून बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी सध्या वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. तसेच, पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक उद्योग, कंपन्यांनाही बस भाडेत्त्वावर दिल्या जात आहेत. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP bus starts from 26 may at pimpri chinchwad city