पूर्ण पगार मिळण्यासाठी 'पीएमपी' कर्मचाऱ्यांनी काढला 'हा' मार्ग, मात्र...

संजय बेंडे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कोरोनामुळे पीएमपी बसची संख्या कमी झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार करणेही अवघड झाले आहे.

भोसरी : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएमएल) पिंपरी-चिंचवड शहरातील आगारामधील वाहक आणि चालकांना दिवसाआड काम दिले जात आहे. कामाच्या दिवसाचाच पगार त्यांना मिळत आहे. महिन्याचा पगार पूर्ण मिळण्यासाठी हे कर्मचारी काम नसलेल्या दिवसांसाठी पगारी रजेचा अर्ज भरत आहेत. मात्र, ज्यांच्या रजा संपल्या आहेत, अशा कर्मचाऱ्यांना अर्ध्याच महिन्याचा पगार मिळत आहे. तसचे, अर्जित रजा संपल्यानंतर पुढे रजेची गरज पडल्यास काय करायचे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनामुळे पीएमपीच्या बसची संख्या कमी झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार करणेही अवघड झाले आहे. परिणामी पीएमपीने आपले कर्मचारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कोरोनाच्या उपाययोजनात्मक कामासाठी वर्ग केले. या कर्मचाऱ्यांचे कामाचे पूर्ण दिवस भरत असल्याने त्यांना महिन्याचा पूर्ण पगार मिळत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा आणि नियमित बस वाहतुकीसाठी काही कर्मचारी पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, नेहरूनगर, निगडी आगारात ठेवून घेतले आहेत. प्रवाशांची संख्या घटल्याने या कामगारांना दिवसाआड काम मिळत आहे. याशिवाय काम केलेल्या दिवसांचाच त्यांना पगार दिला जात आहे. त्यामुळे कामगारांना अर्ध्याच महिन्याचा पगार मिळत आहे. परिणामी महिन्याचा पगार पूर्ण मिळण्यासाठी काम न मिळालेले वाहक-चालक अर्जित रजा दाखवत आहेत. त्यामुळे त्यांना पूर्ण पगार मिळत आहे. मात्र, अर्जित रजा संपल्यावर करायचे काय, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे. तसेच, भविष्यात अर्जित रजेच गरज भासल्यास बिनपगारी रजा घ्यावी लागणार आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
   
दरम्यान, अर्धाच पगार मिळत असल्याने घरभाडे, घरखर्च आणि इतर खर्च कसा भगवावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला आगारात काम नसेल, तर पुणे किंवा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कोरोनाच्या कामकाजासाठी पीएमपीने वर्ग केले पाहिजे. जेणेकरून आम्हाला महिन्याचा पूर्ण पगार मिळेल, अशी मागणी एका कर्मचाऱ्याने केली. आमची महिनाभर काम करण्याची इच्छा असतानाही दिवसाआड काम देऊन पीएमपीने आमच्या अडचणीत वाढ केली आहे, अशी तक्रार दुसऱ्या कर्मचाऱ्याने केली. पीएमपीमध्ये रोजंदारीवर भरलेल्या एकाही वाहक-चालकाला काम न मिळाल्याने त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी अनेकांनी आपले मूळगाव गाठले आहे. 

काय आहे अर्जित रजा ?

पीएमपीकडे कायम असलेल्या कर्मचाऱ्यांना महिन्याला तीन पगारी अर्जित रजा मिळतात. जे कर्मचारी या रजा घेत नाहीत, त्यांच्या रजा एकत्र जमा होतात. काही कर्मचारी लग्न किंवा मोठ्या कार्यासाठी अर्जित रजा जमा करतात. जमा केलेल्या तीनशे पगारी अर्जित रजेचा मोबदलाही पीएमपीद्वारे कर्मचाऱ्यांना दिला जातो. मात्र, सध्या पगार कमी येत असल्याने या अर्जित रजा कर्मचाऱ्यांद्वारे घेतल्या जात आहेत. ज्यांच्या रजा शंभरपेक्षा अधिक शिल्लक आहेत, अशा कर्मचाऱ्यांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग केल्याचे, तर रजा कमी असलेल्या काही कर्मचाऱ्यांना डेपोतच ठेवले आहे, असा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

         
शहरातील तीन आगारातील प्रवासी बसची संख्या घटल्याने कामगारांना दिवसाआड काम मिळत आहे. मात्र, वरिष्ठांकडे याविषयी पाठपुरावा केला आहे. लवकरच प्रवासी बसची संख्या वाढवून ही समस्या दूर करण्यात येईल.
- सुभाष गायकवाड, प्रवक्ता, पीएमपीएमएल

 

लॉकडाउन शिथील झाल्यानंतर पीएमपीची प्रवासी वाहतूक सुरळीत होण्याच्या मार्गावर होती. मात्र, दहा दिवसांच्या लॅाकडाउनमुळे आणि कंटेन्मेट झोन वाढल्यामुळे प्रवासी बसची संख्या कमी झाली. त्यामुळे आगारातील सर्व वाहक आणि चालकांना काम देता येत नाही. त्यामुळे दिवसाआड काम देण्याचे नियोजन करावे लागत आहे.
- शांताराम वाघेरे, व्यवस्थापक, सद्गुरू डेपो,  भोसरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pmpml employees are taking paid leave to get full pay in pimpri chinchwad