सोमाटणे टोल नाकाविरोधी मोर्चा पोलिसांनी अडवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदेशीर सोमाटणे टोलनाका बंद करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय टोल हटावो कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा

सोमाटणे टोल नाकाविरोधी मोर्चा पोलिसांनी अडवला

तळेगाव स्टेशन : कुठल्याही नियमात न बसणारा बेकायदेशीर सोमाटणे टोलनाका राज्य रस्ते विकास महामंडळाने बंद करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय टोल हटावो कृती समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने, शांततेत शनिवारी (ता.१६) काढण्यात आलेला जनआक्रोश मोर्चा पोलीसांनी सोमाटणे फाटा येथे अडवला.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्यांना मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता.

सकाळी अकरा वाजता तळेगाव दाभाडे येथील लिंब फाटा येथून मोर्चाला सुरुवात झाली.तळेगावसह मावळातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि महीला या मोर्चात "सोमाटणे टोलनाका हटाओ"च्या टोप्या डोक्यावर घालून,हाती झेंडे आणि निषेधाचे फलक घेऊन सामील झाले.बेकायदेशीर टोलनाक्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.मात्र,पोलीसांनी हा मोर्चा टोल नाक्या अगोदरच दोन ठिकाणी रस्त्यावर पोलीस व्हॅन आडव्या लावून रोखण्याचा प्रयत्न केला.

बेकायदेशीर सोमाटणे टोलनाका बंद करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय टोल हटावो कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा

बेकायदेशीर सोमाटणे टोलनाका बंद करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय टोल हटावो कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा

शेवटी सोमाटणे टोलनाक्यापासून अगोदर अर्धा किलोमीटर अंतरावर शिरगाव फाटयावर अडथळे आणि पोलीस व्हॅन लावून अडवण्यात आला.त्या ठिकाणी मोर्चाचे निषेध सभेत रुपांतर झाले.यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे,माजी मंत्री बाळा भेगडे,किशोर आवारे,गणेश खांडगे,गणेश काकडे,संतोष दाभाडे,रविंद्र भेगडे,गणेश भेगडे,किशोर भेगडे,नितीन मराठे,रुपेश म्हाळसकर, यादवेंद्र खळदे,राजेंद्र जांभुळकर, सुनिल पवार,मिलींद अच्युत,कल्पेश भगत यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सामील झाले होते. पोलीसी बळाचा वापर करुन मोर्चा दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला.दुपारच्या कडक उन्हात आंदोलनकर्ते जवळपास दोन तास रस्त्यावर उभे होते.या मोर्चामुळे मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास विस्कळीत झाली.

या मोर्चाची दखल घेऊन येत्या १० मे पर्यंत सोमाटणे टोलनाका बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.या पार्श्‍वभूमीवर राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी कमलाकर फड यांनी यासंदर्भात येत्या सोमवारी (ता.१८) पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर बैठक बोलावली आहे.आठवडाभरात राज्यसरकारच्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बैठक घेऊ.न्याय मिळाला नाही तर तुमचा लोकप्रतिनिधी आंदोलकांच्या बाजूने असेल असे आश्वासन खासदार बारणे यांनी दिले.

Web Title: Police Block Toll Naka Morcha Warning Intense Agitation Tolanaka Closed May

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..