कोरोनाबाधित व्यक्ती गेली पोलिस चौकीत; मग पोलिस...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

- घरगुती भांडणाच्या प्रकरणात पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी आली होती व्यक्ती.

पिंपरी : घरगुती भांडणाच्या प्रकरणात पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या एकाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या एका चौकीतील पाच पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोघा भावांमध्ये घरगुती वाद  झाल्याने दोघेही तक्रार देण्यासाठी मंगळवारी (ता.19) पोलिस चौकीत आले. पोलिसांनी एकाची अदखलपात्र तक्रार घेतली तर दुसऱ्याला नोटीस बजावून घरी सोडून दिले. यापैकी एकाला दुसऱ्या दिवशी सर्दी व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याची औंध येथील जिल्हा रूग्णालयात कोरोना तपासणी करण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यामध्ये तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे मागील काही दिवसांत तो ज्यांच्या संपर्कात आला त्यांची माहिती घेतली असता तो पोलिस चौकीत आल्याचे समोर आले. यामुळे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत असलेल्या एका चौकीतील पाच पोलिसांना शनिवारी (ता.23) क्वारंटाईन करण्यात आले. 

कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा सातवर

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आणखी एक पोलिस हवालदार कोरोनाबाधित असल्याचा अहवाल शनिवारी (ता.23) प्राप्त झाला. त्यामुळे आयुक्तालयातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या सातवर गेली आहे. यापूर्वी पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक व तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. अशातच शनिवारी आणखी एका हवालदाराचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Quarantine after contact with Corona Infected People in Pimpri