दहा लाख दे नाहीतर किडनी दे; तरुणाचं अपहरण करून महिला पोलिसानं मागितली खंडणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

  • आरोपींमध्ये दोन पोलिसांचा समावेश 

पिंपरी : पिंपरीतील पोलिस शिपाई महिलेने तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवले. तरुणाकडून घेतलेले पैसे देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील पोलिस शिपाई महिलेने पुण्यातील पोलिस शिपाई नातेवाईक, तिची आई आणि अन्य चार जणांसोबत मिळून तरुणाचे अपहरण केले. इंदापूर जवळील जंगलात नेऊन त्याला मारहाण केली. तरुणाचे व पोलिस शिपाई महिलेचे फोटो आणि व्हिडिओचा पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणाचा मोबाईल फोडून टाकला. आरोपींनी तरुणाकडे दहा लाख रुपयांची खंडणी अथवा किडनी मागितल्याचा हा प्रकार भरदिवसा घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सूरज असगर चौधरी (वय 21, रा. त्रिवेणीनगर, ओटास्कीम, निगडी) असे अपहरण, मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने याबाबत वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी महिला पोलिस शिपाई ही पिंपरी वाहतूक शाखेत कार्यरत आहे. तर तिचा नातेवाईक पोलिस पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे. पिंपरीतील महिला पोलिस व फिर्यादी सूरजचे अनैतिक संबंध होते. तिने सूरजकडून काही पैसे घेतले होते. ते पैसे देण्यासाठी आरोपींनी सूरजला 5 डिसेंबरला (शनिवार) थेरगाव येथील रॉयल कोर्ट सोसायटीसमोर बोलावून घेतले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार सूरज सकाळी सव्वादहाच्या सुमारास त्याठिकाणी गेला. त्यानंतर आरोपींनी सूरजला एका मोटारीत जबरदस्तीने बसवून इंदापूरजवळ असलेल्या जंगलात नेले. तिथे त्याला लाकडी दांडक्‍याने, कोयत्याने मारहाण केली. दरम्यान, आरोपींनी सूरजचा मोबाईल फोन घेतला. महिला पोलिसाचे सूरजसोबत असलेले फोटो आणि व्हिडिओ नष्ट करण्याच्या उद्देशाने सूरजचा मोबाईल फोन फोडून फेकून दिला. त्यानंतर आरोपींनी सूरजकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. दहा लाख रुपये दे नाहीतर तुझी किडनी दे, अशी मागणी करीत धमकी दिली. हा प्रकार सकाळी सव्वादहा ते दुपारी तीन या कालावधीत घडला. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police women had kidnapping a youth and demands ransom at pimpri chinchwad