
गुन्हेगारी मोडीत काढण्यासह शहराची कायदा-सुव्यवस्था कायम राखणे यासह राजकीय हस्तक्षेप ही आव्हाने नवीन पोलिस आयुक्तांपुढे आहेत.
Vinaykumar Chaubey : पिंपरी शहरात पोलिस आयुक्तांसमोर राजकीय हस्तक्षेप हेच आव्हान
पिंपरी - गुन्हेगारी मोडीत काढण्यासह शहराची कायदा-सुव्यवस्था कायम राखणे यासह राजकीय हस्तक्षेप ही आव्हाने नवीन पोलिस आयुक्तांपुढे आहेत. शिवाय नवीन आयुक्तालय असल्याने अनेक प्रश्न कायम आहेत. मुख्यालय व प्रशस्त आयुक्तालयाच्या इमारतीसाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यास अद्याप मुहूर्त लागलेला नाही. अपुऱ्या मनुष्यबळाचाही प्रश्न कायम आहे.
पिंपरी-चिंचवडसाठी १५ ऑगस्ट २०१८ ला स्वतंत्र पोलिस आयुक्तालयात स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत चार आयुक्त झाले आहेत. यामध्ये एकाचाही कार्यकाळ पूर्ण झाला नाही. भाजप सरकारच्या कार्यकाळात आयुक्तालय स्थापन झाले. त्यावेळी अपर पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी आर. के. पद्मनाभन यांनी नेमणूक करण्यात आली. त्यांना सोळा महिन्यांचा कालावधी मिळाला, त्यांच्यानंतरचे संदीप बिष्णोई तेरा महिने राहिले. राज्यात सत्तांतर झाल्यावर पोलिस आयुक्त पद पदावनत करून विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे करण्यात आले. या पदावर आलेल्या कृष्ण प्रकाश यांची अठरा महिन्यात बदली झाली. नंतरच्या अंकुश शिंदे यांना केवळ आठ महिन्यांचाच कालावधी मिळाला. आता हे पद उन्नत करून पुन्हा अपर पोलिस महासंचालक दर्जाचे केले आहे. विनयकुमार चौबे यांनी पाचवे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
चौबे यांच्यासमोर गुन्हेगारी मोडून काढण्याचेही आव्हान आहे. खून, टोळीयुद्ध, तोडफोड अशा गंभीर गुन्हांच्या घटना पाठोपाठ घडत आहेत. आता तर भररस्त्यात,भरदिवसा अंदाधुंद गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. यामुळे शहर हादरले आहे. सायबर क्राईम, औद्यागिक पट्ट्यातील खंडणी वसुली यासह स्ट्रीट क्राईमचाही प्रश्न गंभीर आहे.
अंकुश शिंदे यांच्या बदलीमागे पालकमंत्र्यांवरील शाईफेकीची किनार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीच्या इतर आयुक्तांच्या कार्यकाळातही अनेकदा राजकीय हस्तक्षेप असायचा, हे सर्वश्रुत आहे. महापालिका निवडणूका तोंडावर आहेत. सत्ता आणण्यासाठी राजकीय पक्ष तयारीत आहेत. अशातच शहराची कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याचे मोठे आव्हान पोलिस दलापुढे आहे. राजकीय दबाव, हस्तक्षेप झुगारून नवीन आयुक्त काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवडणुकीत लागणार कस
चौबे यांनी पदभार हाती घेताच गुन्हेगारी मोडून काढण्यासह सायबर क्राईमवर अधिक लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले. शहरात काम करताना पोलिस अधिकाऱ्यांना राजकीय दबावाला सामोरे जावे लागते, अशातच निवडणूक तोंडावर आहेत, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. सर्वच निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस यंत्रणा योग्य काम करीत असल्याचे ते म्हणाले. मात्र, राजकीय दबावाबाबत थेट उत्तर देणे टाळले. यावरून नवीन आयुक्त राजकीय हस्तक्षेप कसे हाताळतात हे येत्या काळात समजणार आहे.