मावळ : तळेगावात कोरोना नियोजन बैठकीवरून 'राजकारण' 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

  • नगरसेवक, आमदारांच्या स्वतंत्र बैठका
  • गुरुवारपासून घरोघर सर्वेक्षण होणार 

तळेगाव दाभाडे (सकाळ वृत्तसेवा) : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नगर परिषदेत आमदार व नगरसेवकांच्या नियोजनासाठी स्वतंत्र दोन बैठका पार पडल्या. नगरसेवकांच्या बैठकीत अनुपस्थित राहिल्याबद्दल नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची लेखी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली. तसेच नागरिकांसाठी कोरोना केअर सेंटरच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या आमदार-अधिकारी यांच्यातील बैठकीत कोरोना सेंटरची उभारणी करण्याची आवश्‍यकता नसून, येत्या गुरुवारपासून शहरात सर्वेक्षणाला सुरुवात करण्याचा निर्णय आमदार सुनील शेळके यांनी जाहीर केला. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नगर परिषदेच्या वतीने घरभेट सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार मुख्याधिकारी रवी पवार यांनी नगरसेवकांना मोबाइलव्दारे तीन मेसेज पाठवून बैठकीची माहिती दिली. नगरसेवक सकाळी दहा वाजता बैठकीला उपस्थित झाले. त्यानंतर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आले. तरी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे व मुख्याधिकारी रवी पवार आले नाहीत. त्यामुळे नगरसेवक संतापले. नगरसेवक किशोर भेगडे यांच्या सूचनेनुसार उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू करण्यात आली. त्याला पक्षनेते अमोल शेटे यांनी सहमती दर्शविली. संवेदनशील विषयावर नगराध्यक्षा जगनाडे व मुख्याधिकारी पवार उदासीन असल्याबद्दल नगरसेवकांनी त्यांचा निषेध केला. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली बैठकीत नगर परिषदेच्या वतीने कोरोना केअर सेंटरची उभारणी करून नागरिकांना सुविधा देण्याचा विषय गणेश खांडगे यांनी मांडला. यासाठी दोन नवीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा जनसेवेचे किशोर आवारे यांनी केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'तर फौजदारी गुन्हे दाखल करणार' 

दुपारी आमदार शेळके यांच्यासमवेत अधिकाऱ्यांची बैठक झाली. गुरुवारपासून (ता. 24) घरोघर सर्वेक्षण करण्यात येणार असून, निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. यासाठीचे सोमवारपासून प्रशिक्षण देण्यात येणार असून, उपस्थित न राहिल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिले. या वेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, रवी पवार, नगराध्यक्षा जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेविका संगीता शेळके यांसह अधिकारी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: politics about corona planning meeting in talegaon maval