पिंपरीमध्ये माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकारी पद नऊ वर्षांपासून रिक्तच 

आशा साळवी 
Wednesday, 2 September 2020

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी पद गेल्या नऊ वर्षांपासून रिक्त आहे.

पिंपरी  : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी पद गेल्या नऊ वर्षांपासून रिक्त आहे. या विभागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने चक्क अकरा अधिकाऱ्यांनी प्रभारी कारभार पाहिला आहे. परिणामी या विभागाला "कोणी पूर्णवेळ अधिकारी देता का ? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माध्यमिक विभागाला कोट्यवधी रुपयांची तरतूद आहे. या विभागांतर्गत 18 माध्यमिक विद्यालये, सहा उर्दू माध्यमांचे वर्ग आणि चार ठिकाणी संगीत अकादमी चालविण्यात येते. विद्यालयांच्या आवश्‍यकतेनुसार या विभागाकरता स्वतंत्र शिक्षणाधिकारी पदाची आवश्‍यकता आहे. तशी या पदाला मंजुरीदेखील आहे.

दरम्यान, 2012 मध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू जाधव यांनी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर अनेक मुख्याध्यापकांनी सेवा ज्येष्ठतेनुसार दावा केला आणि सहा महिन्यातच निवृत्त झाले. ज्येष्ठता नुसार क्रीडाप्रबोधिनीचे मुख्याध्यापक बाळासाहेब सातव यांनी सहा महिने कारभार पाहिला, आणि ते ही निवृत्त झाले. त्यानंतर मुख्याध्यापिका उत्तरा कांबळे आणि अलका कांबळे यांची प्रभारी नियुक्ती केली. पण काही दिवसांतच त्यांच्यावर विविध आरोप झाल्यावर त्यांनाही खुर्ची खाली करावी लागली. त्यानंतर प्राथमिक विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडेच माध्यमिक विभागाचा प्रभारी कारभार देण्यात आला. त्यानुसार आठ प्रशासन अधिकाऱ्यांनी काम पाहिले. पण अर्धवेळ असल्याने त्यांना ठोस निर्णय घेण्यात अपयश आले. त्याचा परिणाम मुलांच्या प्रगतीवर झाला. 

हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

दरम्यान, तत्कालीन प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांच्यानंतर सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांच्याकडे दोन्ही विभागाची जबाबदारी आली. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. त्यांच्याकडे प्रशासन आणि अध्यापनाचा अनुभव असल्याने मागील तीन वर्षापासून मुंढे खुर्ची सांभाळून आहेत. तसेच महापालिकेच्या विधी समितीने मुंढे यांना पूर्णवेळ अधिकारी नेमा असा ठरावदेखील केलेला आहे. मात्र त्यांचे आदेश गुलदस्त्यात आहेत. 

...ही खुर्ची नको रे बाबा 
या विभागाला तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू जाधव यांच्यानंतर एकही पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही. त्यांच्यानंतर अनेक मुख्याध्यापकांना संधी मिळाली. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा आली होती.ही परिस्थिती पाहता अनेक मुख्याध्यापकांनी सेवाज्येष्ठतेनुसार दावा करणे सोडून देत "ही खुर्ची नको रे बाबा' अशीच काहीशी भूमिका घेतली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The post of Secondary Education Officer in Pimpri has been vacant for nine years