नाणे मावळात महावितरणच्या 'महा'समस्या; शेतकरी, व्यावसायिकांना फटका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 December 2020

शेतकऱ्यांना द्यावे लागते रात्री शेताला पाणी; व्यावसायिकांना फटका 

करंजगाव (ता. मावळ) : वीज खंडित होणे ही बाब नाणे मावळसाठी नवीन नाही. त्यामुळे शेतकरी, पोल्ट्री, पीठगिरणी व्यावसायिकांना मोठा फटका बसतो आहे. सध्या कडाक्‍याची थंडी सुरू असून, जंगलातील प्राणी शेतात येत आहेत. जिवावर उदार होऊन शेतकऱ्यांना रात्री शेताला पाणी द्यावे लागत आहे. वीज गेल्यानंतर कामशेतच्या पुढील जांभवलीपर्यंतच्या गावकऱ्यांनी पुन्हा त्याच दिवशी लाइट येईल, अशी अपेक्षा ठेवणे सोडून दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडकरांनो, ख्रिसमसनिमित्त शहरात नवीन नियम लागू

नाणे मावळातील शेतकऱ्यांची पिके विजेच्या अनियमिततेमुळे धोक्‍यात येत आहे. वडिवळे धरणामुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या जोरावर या भागात उसाचे व इतर अनेक प्रकारच्या पिकांचे उत्पादन शेतकरी घेत असतात. महावितरणाच्या दुर्लक्षित कारभारामुळे येथील शेतकऱ्यांची धरण उशाला अन्‌ कोरड घशाला, अशी परिस्थिती झाली आहे. नाणे गावातील रामदास आंद्रे, गुलाब सातकर, भाऊ आंद्रे, सीताराम भोंडवे, खंडू आंद्रे, बळिराम धोत्रे, शंकर कटके, बंडू सातकर आदी शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व केबल चोरीला गेल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होऊन, पिकांना पाणी देण्याच्या कामांचा खोळंबा झाला आहे. 

केबल चोरीच्या प्रकरणांत वाढ 
नाणे, कांबरे व करंजगावातील अनेक शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबल चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. 

ऐंशी हजार वीजबिल 
नाणे येथील शेतकरी नामदेव खोंडे यांना अचानक ऐंशी हजारांचे कृषी पंपाचे बिल आले आहे. प्रत्यक्षात क्षेत्र व वापर कमी असताना आलेले बिल हे अव्वाच्या सव्वा आहे. या बाबत महावितरणचे सोईस्कर दुर्लक्ष आहे. 

सहा महिन्यात बिले सरसकट 
अतिवृष्टीचा तालुका म्हणून ओळख असलेल्या मावळात मॉन्सूनच्या काळात मोटारी बंद असतात. पुढील पिकांच्या तयारीला वाफसा नसल्याने एकंदरीतच अनेकांच्या पाच-महिने मोटारी बंदच राहतात. मात्र, कृषिपंपाची वीज न वापरता सरसकट बिले वसूल केली जातात. 

शेती करंजगावात तर ट्रान्सफॉर्मर बुधवडीत 
करंजगाव व बुधवडी या दोन्ही गावांदरम्यान वाहत्या नदीचा प्रवाह असल्याने करंजगावतील शेतकऱ्यांना डीपीवरचा फ्यूजही टाकायला जाता येत नाही. या छोट्या समस्येमुळे दिवसभर मोटारी बंद राहतात, असे करंजगावचे शेतकरी भाऊसाहेब मोरमारे, मंगेश मोरमारे, संजय टाकवे, संजय भुरुक यांनी सांगितले. 

वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याबाबत कामकाज सुरू आहे. काही दिवसातच हा प्रश्न सुटेल. शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी फायदा होईल. प्रसंगी चोरटे पकडले जाऊ शकतात. 
- विजय जाधव, कार्यकारी उपअभियंता मावळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: power outages in nane maval