पिंपरी-चिंचवडमध्ये महावितरणचा लपंडाव काही संपेना; ऐन सणालाच होते बत्ती गुल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

ऐन दसऱ्याच्या दिवशी तांत्रिक बिघाड झाल्याने पिंपरीगाव, काळेवाडी, रहाटणी, निगडी आणि चिखली घरकुल परिसरात वीजपुरवठा सायंकाळी खंडित झाला होता.

पिंपरी : ऐन दसऱ्याच्या दिवशी तांत्रिक बिघाड झाल्याने पिंपरीगाव, काळेवाडी, रहाटणी, निगडी आणि चिखली घरकुल परिसरात वीजपुरवठा सायंकाळी खंडित झाला होता. सणासुदीच्या दिवशी घरात अंधार झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. तब्बल दोन तासानंतर तो सुरळीत झाला. सोमवारीही (ता. 26) अधूनमधून वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास चिंचवड ट्रान्सफॉर्मरवरून पिंपरीगावात जोडणाऱ्या वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. ही जोडणारी वीजवाहिनी ट्रीप झाल्याने पिंपरीगावातील वीजपुरवठा काहीकाळ बंद झाला. याबाबत कार्यकारी अभियंत्याकडे तक्रार केली, पण त्यांना काहीच माहीत नसल्याचे ग्राहक श्रीरंग शिंदे यांनी सांगितले. वीजपुरवठा दोन तासानंतर सुरळीत झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काळेवाडीच्या सुरेखा कुटे म्हणाल्या, "काळेवाडी, रहाटणी, थेरगाव या परिसराचाही वीजपुरवठा खंडित झाला होता. काळेवाडीत वीज जात नाही, असा एकही दिवस जात नाही. पाऊस वा इतर कुठलेही कारण लागत नाही. दिवसातून एकदाच जाऊन ती थांबत नाही, तर अनेकदा गायब होते. आता किमान दसरा, दिवाळी या सणासुदीला, तरी वीजपुरवठा सुरळीत राहील, याकडे महावितरणने लक्ष द्यावे.'' वाकडचे बाळाजी शिंदे म्हणाले, "पावसाला सुरुवात झाल्यावर लगेच वीज गायब होते. ऐन दसऱ्याच्या दिवशी वीज नसल्याने हिरमोड झाला. स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष दिले पाहिजे.'' 

"पावसामुळे अडचणी निर्माण होत आहे. महावितरणकडून दुरुस्ती-देखभालीचे काम सुरू आहे.'' 
- शिवाजी वायफळकर, कार्यकारी अभियंता, महावितरण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: power supply disconnect in pimpri chinchwad on occasion of dussehra