esakal | निराधार ‘प्रभा’ची नाव ‘किनारा’ला; लॉकडाउनमध्ये दाखवली माणुसकी
sakal

बोलून बातमी शोधा

Prabha Nair

निराधार ‘प्रभा’ची नाव ‘किनारा’ला; लॉकडाउनमध्ये दाखवली माणुसकी

sakal_logo
By
गणेश बोरुडे ​

तळेगाव स्टेशन - तळेगाव दाभाडे येथील पदपथावर गेल्या काही दिवसांपासून निराधार वृद्ध महिला (Old Women) होती. काही समाजसेवकांनी (Social Worker) त्या वृद्ध महिलेला अहीरवाडे येथील किनारा वृद्धाश्रमात (Kinara Old Age Home) दाखल केले. लॉकडाउनच्या काळात दाखविलेल्या माणुसकीमुळे (Humanity) निराधार वृद्धेची एकाकीपणात भरकटलेली नाव किनाऱ्याला लागली. (Prabha Old Women Baseless Kinara Old Age Home Humanity)

तळेगावात गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसादरम्यान काका हलवाईजवळील पदपथावर एक ७५ वर्षीय वृद्धा कुडकुडत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर एका रिक्षाचालकाने तिला गाडीत बसवून, घोरवाडी स्टेशन नाक्याजवळ सोडले. आजूबाजूच्या काही विघ्नसंतोषी लोकांनी आक्षेप घेत त्या वृद्धेची मुलगी निगडी येथे राहण्यास असून तिकडे सोडा, असे सांगितले. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरती तिथे राहिलेली महिला काही दिवसांनी पुन्हा गाव ते स्टेशन रस्त्यावरील हचिंगस्कूलसमोरील पदपथावर दिसून आली. या निराधार वृद्धेला एकटी पदपथावर बसलेली पाहून सामाजिक कार्यकर्त्या सीमा कांचन (कदम) यांना दया आली. गाडी थांबवून चौकशी केली असता प्रभा नायर, असे या निराधार वृद्धेचे नाव होते.

हेही वाचा: ट्रक मोटारीच्या धडकेत डेप्युटी कमिशनरसह एकाचा मृत्यु

मूळच्या केरळमधील असलेल्या प्रभा काही वर्षांपूर्वी पतीसह तळेगावात रोजीरोटीसाठी आलेल्या होत्या. त्यानंतर पती वारले आणि मुलींही आईला वाऱ्यावर सोडून निघून गेले. एक रिक्षाचालक जावई आणि मुलगी पुण्यात कुठेतरी राहते, असे प्रभा यांनी सांगितले. बरेच दिवस खायला न भेटल्याने ती क्षीण झाली होती. त्यामुळे थोडे खायला दिल्याने तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव आला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांच्यामार्फत सोमवारी (ता. २४) रात्री फोनवरून सीमा यांना सर्व कल्पना दिली. त्यांनी अहिरवाडे येथील किनारा वृध्दाश्रमाच्या संचालिका प्रीती वैद्य यांच्याशी संपर्क साधला. वैद्य यांनी रात्री साडेदहाला येऊन त्या निराधार वृद्धेला आश्रमात दाखल करून घेतले.

लॉकडाउनमध्ये दाखवली माणुसकी

सीमा आणि प्रीती या दोघींचा ठाम विश्वास होता की, आजीला एक नवं आश्वासक आणि विश्वासक विश्व द्यायचं. त्यातूनच या निराधार प्रभाला आता किनारा वृद्धाश्रमात आसरा मिळाला असून तिथे त्या मजेत राहत आहेत. कोरोनाच्या भयावह संसर्गाच्या परिस्थितीत माणूसच माणसाजवळ जायला भीत असताना सामाजिक कार्यकर्त्यांसह किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिक यांनी लॉकडाउन काळात माणुसकी दाखवली.